वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरत आहे. सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू महागल्याने जनतेचे दिवाळे निघत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
बीडमध्ये रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये थाळीनाद आंदोलन करण्यात आले. डॉ. क्षीरसागर म्हणाले, अच्छे दिनच्या नावाखाली भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे. डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. मोठय़ा प्रमाणावर साठेबाजी होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सणासुदीच्या काळातच महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेला सण साजरे करावे की नाही, अशी परिस्थिती या सरकारने निर्माण केली आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोघेही सर्वसामान्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू शकले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. यावेळी नगराध्यक्षा रत्नमाला दुधाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफीक, महिला आघाडीच्या अॅड. हेमा िपपळे, अॅड. वर्षां दळवी आदींसह कार्यकत्रे उपस्थित होते.