जिल्ह्य़ातील चार नगरपंचायतींच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचे पानिपत झाले. घनसावंगी, जाफराबादमध्ये राष्ट्रवादीने, तर मंठा नगरपंचायतीत शिवसेनेने निर्विवाद बहुमतासह झेंडा फडकावला. बदनापूरमध्ये राष्ट्रवादीचे ६, तर काँग्रेसचे ३ उमेदवार विजयी झाले. बदनापूरमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आल्यास त्यांची सत्ता येऊ शकते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा जिल्हा असल्याने भाजपसाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या होत्या. बदनापूर व जाफराबादमध्ये भाजप-शिवसेनेची युती होती. या दोन्ही ठिकाणी खासदार दानवे यांनी प्रचारात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. बदनापूरमध्ये १७पैकी ६ जागा राष्ट्रवादी, ३ जागा काँग्रेस, २ जागा शिवसेनेने, तर ३ अपक्षांनी जिंकल्या. भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या विधानसभा मतदारसंघात ही नगरपंचायत आहे. भाजप आमदार संतोष दानवे यांच्या मतदारसंघातील जाफराबाद नगरपंचायतीत १७पैकी एकच जागा भाजपला जिंकता आली. शिवसेनेलाही एका जागेवरच समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीने ९ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला ४ व अपक्षांना २ जागांवर विजय मिळाला. येथे शिवसेना-भाजपची युती होती.
मंठा नगरपंचायतीत शिवसेना-भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली. सेनेने ९ जागा स्वबळावर जिंकून नगरपंचायतीची सत्ता प्राप्त केली. स्वतंत्रपणे निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेसने ५ जागा जिंकल्या, राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या मतदारसंघातील या नगरपंचायतीत भाजपला अवघ्या ३ जागांवरच विजय मिळवता आला. राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांच्या मतदारसंघातील घनसावंगी नगरपंचायतीत १७पैकी १२ जागा जिंकून त्यांनी वर्चस्व सिद्ध केले. एकत्रित निवडणूक लढविणाऱ्या भाजपला २, तर शिवसेनेला १ जागा मिळाली. एमआयएम व अपक्षाला एकेक जागा मिळाली. चार नगरपंचायतींच्या एकूण ६८ जागांमध्ये सर्वाधिक २७ जागा राष्ट्रवादी, त्यापाठोपाठ १३ जागा शिवसेना, काँग्रेसला ११ जागा, तर ९ जागांसह भाजप चौथ्या क्रमांकावर गेला.
नेत्यांच्या प्रतिक्रिया
आमदार टोपे म्हणाले की, जनतेने आमच्यावर विश्वास टाकताना ४पैकी ३ नगरपंचायती आमच्या ताब्यात दिल्या आहेत. बदनापूरला राष्ट्रवादीस ६ जागा मिळाल्या असल्या तरी एक अपक्ष आमचाच आहे. तेथे काँग्रेसचे ३ सदस्य आमच्यासोबत राहतील. जाफराबादेत १७पैकी ९ नव्हे तर १० सदस्य आमचे आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा भ्रमणध्वनीवर संपर्क होऊ शकला नाही. परंतु त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे यांनी मतदारांचा कौल मान्य असल्याचे सांगितले. निवडणूक झालेल्या ठिकाणी भाजपला मानणारा मतदार तुलनेने कमी होता. परंतु आता या ठिकाणी पक्ष संघटन अधिक बळकट करण्यास प्रयत्न करण्यात येतील, असे ते म्हणाले. सेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी चारपैकी एक नगरपंचायत निर्विवादपणे पक्षाच्या ताब्यात आली, या बद्दल आनंद व्यक्त केला. सेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी मंठा येथील जनतेने सेनेच्या भूमिपुत्रांच्या बाजूने कौल दिला आहे. भाजपची धनशक्ती व शिवसेनेची जनशक्ती अशी ही लढाई होती, असे म्हटले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी, मंठा येथे पक्षाला चांगले यश मिळाले. जिल्ह्य़ात काँग्रेसने भाजपपेक्षा ४ अधिक जागा मिळविल्या. एकही नगरपंचायतीत भाजप सत्तेत येऊ शकली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे, असे सांगितले.