|| सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : मराठवाड्यातील महापालिका क्षेत्रांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व असून नसल्यासारखे. नांदेड, लातूरमध्ये तर जणू शून्यवत स्थिती. त्यात गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीतून झालेले घाऊक पक्षांतर यामुळे शहरी भागात राष्ट्रवादीचे कुपोषण तसे चौथ्या श्रेणीतील.

गंभीर कुपोषित असणारा हा पक्ष बीड वगळता अन्य जिल्ह्यात एक खांबी तंबूसारखा. काही नेते मतदारसंघापुरते तर बहुतांशी नेत्यांचा शहरी घडामोडीतील रस केवळ चटई निर्देशांकापुरता. पडझडीनंतरच्या काळात राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा दौरा भुवया उंचवायला लावणारा मानला जात आहे. संघटनात्मक पातळीवरच्या पुढाऱ्यांनी जवळच्या व्यक्तींच्या बदल्यांसाठी किंवा शैक्षणिक संस्थांच्या अडचणी सोडवून आणण्यापलीकडे काही घडत नसल्याने मराठवाड्यात वाव असूनही पडझडीनंतरही राष्ट्रवादीची वाढ खुंटली असल्याचे दिसून येत आहे. त्याला गटबाजीही कारणीभूत असल्याचे म्हटले जाते.

औरंगाबाद महापालिकेत केवळ चार नगरसेवक. महापालिकेच्या कारभारात त्यांचे ठळक अस्तित्व न जाणवणारेच.  पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शहरी भागात लक्ष घालू नये असे म्हणणाऱ्यांची संख्या अधिक. अनेक दिवस कार्यकारिणी करण्यासही वेळ लावल्यानंतर प्रश्न हाती घेतला आणि तडीला नेला असे एकही उदाहरण दिसून येत नाही.  त्यामुळे ग्रामीण भागातून शरद पवार यांचे समर्थक शहरी भागात कार्यकर्ते म्हणून घ्यायला तयार नसतात. मग कोणी तरी वाढदिवस साजरा करतो तो जणू पक्षाची दिशा देणारा कार्यक्रम असल्यागत भासविले जाते. त्यामुळे शहरी भागातील राष्ट्रवादीची वाढ खुंटलेली.

नांदेडसारख्या जिल्ह्यात  एकेकाळी केंद्रीय ग्रामविकास खात्याच्या राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माधवराव किन्हाळकर यांनी आता भाजपला जवळ केले आहे. महापालिकेतील अस्तित्व तर शून्यच. शहरी प्रश्न आपले नाहीत, अशी  स्थानिक नेत्यांची भूमिका आहे की काय?

उस्मानाबाद जिल्ह्यात राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीतील अन्य नेत्यांना पक्ष बांधता आला नाही. जीवनराव गोरे, सुरेश पाटील यांनी कधी शहरी प्रश्नांना हात घातला नाही. सहकार, जिल्हा परिषदा आणि साखर कारखान्यांच्या पुढे  प्रश्नच हाती घेतला नसल्याने शहरी प्रश्नांभोवती राष्ट्रवादीचे ना कोणी कार्यकर्ते काम करतात, ना लक्ष घालतात. सत्ता असताना मोठ्या गाडीवर घड्याळाचे बोधचिन्ह लावणारे कंत्राटदार कार्यकर्ते बदल्या, नियुक्त्यांसाठी हालचाली करतात. त्यामुळे मराठवाड्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बांधणीसाठी जयंत पाटील यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगण्यात येत आहे.  जालना जिल्ह्यात राजेश टोपे यांचे आरोग्यमंत्री म्हणून असणारे काम प्रभावी असले तरी जालना शहरात त्यांचा राजकीय प्रभाव फारसा जाणवत नाही. दुष्काळी मराठवाड्यात साखर कारखान्यांभोवती राष्ट्रवादीचे राजकारण फिरत राहील असे संकेत मिळत आहेत. जालना येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच पाहणी केली. त्यानंतर राष्ट्रवादीने  संघटनात्मक बांधणी हाती घेतली आहे.

मराठवाड्यात परभणी आणि हिंगोलीत राष्ट्रवादीचा तसा प्रभाव आहे. परभणी महापालिकेत राष्ट्रवादी कॉंगे्रस विरोधी पक्षात आहे. हिंगोली शहरवगळता राष्ट्रवादीची सत्ता वसमतमध्ये. जयप्रकाश दांडेगावकर यांचा या मतदारसंघातील प्रभाव कायम असल्याने राजू नवघरे यांनाही यश मिळाले. अन्यत्र सर्व सत्ता ही साखर कारखान्याच्या गाडीभोवती केंद्रित झालेली आहे.

औरंगाबादमधील स्थिती काय?

औरंगाबाद जिल्ह्यातून राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही. सारे आमदार बीड जिल्ह्यात एकवटलेले. धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, बाळासाहेब आसबे आणि संदीप क्षीरसागर ही मंडळी राष्ट्रवादीची. नेतृत्व करणारा चेहरा मुंडे यांचा. पण बीड शहरात पुन्हा गटबाजीच अधिक. मूळ गावात सुविधा निर्माण न करता शहरी भागातच घर करण्याच्या नेत्यांच्या वृत्तीमुळे राष्ट्रवादीचा शहरी मुखवटा तसा हरवलेला.