वंचित बहुजन नेत्यांशी चर्चा करण्यासाठी औरंगाबादमध्ये होतो. त्यावेळी कन्नड येथील बंजारा समाजाचा तरुण योगेश राठोड याचा मृत्यू कारागृहामध्ये झाला. त्याठिकाणी जावून माहिती घेतली असता तो तरुण रक्तबंबाळ सापडला. त्याचे फोटो माझ्याजवळ आहेत. २४ तास झाले शवविच्छेदन झाले नाही. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खूणा आहेत असे डॉक्टरांनी सांगितले. कारागृहातील लोकांनी त्या तरुणाचा खून का केला, या राज्यात काय चालले आहे, कुणी अधिकार दिला तुम्हाला मारण्याचा असा संतप्त सवाल माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केला.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमधील बंजारा तरुणाला कारागृहातील अधिकार्‍यांनी मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या स्थानिक मुद्याला भुजबळ यांनी हात घातला. शिवाय राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरल्याचा आरोपही केला.

भुजबळ यांनी भाजपा सरकार आणि त्यांच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्रालाच मिळाले पाहिजे. एक थेंब गुजरातला देता कामा नये असा लढा उभारला गेला पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले. कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर यांनी लिहिले म्हणून संपवण्यात आले. आज कोणीही सुरक्षित नाही. पत्रकारांनी विचार मांडले म्हणून त्यांनाही वृत्त वाहिन्यांमधून जावे लागले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ओबीसी महामंडळाला चार वर्षांत पैसे दिले नाहीत आणि आताच ७०० कोटी देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु आत्ताच का? आताच कळवळा का आला आहे ? कशाला फसवता ओबीसींना… आधी मुलांच्या शिष्यवृत्तीचे पैसे द्या मग हा जुमला करा, असा इशारा भुजबळ यांनी दिला.

ही लढाई मोदी विरुध्द संविधान अशी आहे. त्यामुळे या लढाईत सहभागी आणि परिवर्तन घडवा असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले.