शेतकरी प्रश्नावर शिवसेनेचा लढा म्हणजे दिखाऊपणा असल्याचा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. ते सोमवारी औरंगाबादमध्ये बोलत होते. सरकारला विरोध करायचा आणि अधिवेशन काळात गप्प बसायचं अशी सेनेची भूमिका आहे. शिवसेनेची ही भूमिका बांडगुळासारखी आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीकडून सरकारविरोधात पुकारण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनात मुंडे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली.

सरकारचे निर्णय शेतकरीविरोधी आहेत. सरसकट कर्जमाफीची सरकारने घोषणा केली. मात्र ,अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या प्रश्नावर शिवसेना भाजपला विरोध करत असल्याचे भासवते. मात्र, सभागृहात ते शांत बसतात. शिवसेनेच दोन्ही बाजूंनी ढोल वाजवणं जनतेला कळत असल्याचं मुंडे म्हणाले. मराठवाडा आणि विदर्भात कापूस उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. कपाशीच्या पिकावर बोंड अळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं तात्काळ पाहणी करून हेक्टरी २५ हजार रुपयांचं आंदोलन द्यायला, हवं अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली. अधिवेशन जवळ आलं आहे. शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही, तर सभागृह बंद पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ‘हल्लाबोल’ आंदोलन केलं जात आहे. औरंगाबादमध्ये या आंदोलनाला नववी, दहावीच्या वर्गात शिकणारी मुलं आणण्यात आली होती. सकाळी अकरा वाजता आंदोलनाची नियोजित वेळ होती. मात्र, एक वाजेपर्यंत सुरुवात झाली नव्हती. नियोजित वेळनंतर क्रांती चौकातून आंदोलनाला सुरुवात झाली. त्याठिकाणी गटागटाने कार्यकर्ते हजर झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या एका गटाकडून करण्यात आलेल्या घोषणाबाजीचा उपस्थित कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला. माजी जिल्हा सरचिटणीस गणपतराव खरे यांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी म्हणजे पोरकटपणा असल्याची टीका केली आहे. आपण यशवंतराव चव्हाण यांचे पाईक मानत असेल तर हे शोभत नाही, असं मत त्यांनी मांडलं.