सुप्रिया सुळे यांची टीका; पक्षात घेतलेल्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची मागणी

औरंगाबाद : पवन राजेनिंबाळकर हत्याकांडात आरोपी म्हणून नाव असल्याने सोलापूरच्या सभेत गृहमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ‘वडिलांचा भाजपमध्ये प्रवेश होणार नाही,’ असे मुलाला सांगण्यात आले आणि मुलानेही तुळजापूर येथून वडिलांना पुन्हा घरी पाठविले. वडिलांचा असा अपमान सहन करून राष्ट्रवादीतील नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला. असे मी सहन केले नसते.

पक्ष बदलण्यासही हरकत नाही, पण स्वाभिमान गहाण टाकून होणारे हे प्रवेश त्यांच्यासाठी लाजिरवाणे असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी व्यक्त केली. औरंगाबाद येथे ‘लोकसत्ता’शी बोलताना राजकारणातील बहुचर्चित राणा जगजीतसिंह पाटील यांच्या प्रवेशाच्या वेळी घडलेला हा प्रकार त्यांनी कथन केला. यात काही एक खोटे नाही, असा दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादीचे जे नेते भाजपमध्ये जात आहेत, त्यांची त्यांच्या मुलांनी फरफट केल्याचेही त्या म्हणाल्या.

डॉ. पद्मसिंह पाटील हे हत्येच्या गुन्हय़ातील आरोपी असून त्यांचा गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला तर अधिकच टीका होईल, असे भाजपला वाटल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनी करून ‘वडिलांना प्रवेशाच्या वेळी आणू नका,’ असे कळविले. त्या सूचनेप्रमाणे मुलगाही वागल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘अशा पद्धतीने वडिलांचा अपमान झाल्यानंतरही राणा जगजीतसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.’

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करून काँग्रेस पक्ष सोडणारे हर्षवर्धन पाटील यांनाही त्यांनी फटकारले. हर्षवर्धन पाटील यांच्याशी अनेक वर्षांचे कौटुंबिक संबंध असल्याने मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घरीही दूरध्वनी केला. समाजमाध्यमातून संदेशही पाठविले, पण ते नंतर दोन दिवस उपलब्ध झाले नाहीत. आघाडीच्या जागावाटपात इंदापूर मतदारसंघाची चर्चा झाली नव्हती. असे असताना काँग्रेस सोडण्याचे काय कारण होते? दिराशी भांडण झाले म्हणून नवरा सोडण्यासारखे आहे, असे त्या म्हणाल्या.

२०१४च्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अलीबाबा आणि ४० चोर’ अशी टीका राष्ट्रवादीवर केली होती. आता त्यातील अनेक जण राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आहेत. त्यांना मी चोर म्हणणार नाही. याचा अर्थ गेल्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलत होते, असा अर्थ काढायला हवा. पूर्वी नामदार आणि कामदार असा प्रचार केला जायचा. तेव्हा आम्हाला उत्तर द्यायला जड जायचे. आता ते सारे भाजपमध्ये आहेत. आता पक्षात घेतलेले कोण आहेत, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, असेही खासदार सुळे म्हणाल्या.

अर्थमंत्र्यांचे मंदीबाबतचे विधान धक्कादायक

ओला आणि उबेरमुळे मंदीची स्थिती आली असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे वक्तव्य आपल्यासाठी धक्कादायक आहे. त्यांच्याकडून हे उत्तर अपेक्षित नाही. अर्थ विभागाला वेळोवेळी आम्हीही सूचना केल्या. मात्र, त्या मान्य झाल्या नाहीत. मंदी दिसते आहे, अगदी बारामती मतदार संघात आणि हिंजवडी परिसरात अनेक सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळत नाही. आम्ही सांगितलेल्या सूचना मान्य होत नाही, हे दुर्दैव आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.