13 December 2019

News Flash

राणा जगजीतसिंह पाटील यांचे ‘तळ्यात-मळ्यात’

लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील भाजपमध्ये जाण्यास उत्सुक आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील भाजपमध्ये जाण्यास उत्सुक आहेत. भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांबरोबर त्यांच्या बैठका झाल्या आहेत. अगदी स्थानिक पातळीवरील भाजपच्या नेत्यांनीही त्यांच्या येण्यास अनुकूलता दाखविली आहे. असे झाले तर जिल्हा बँक आणि सहकार क्षेत्रातील विविध संस्थांवर पहिल्यांदाच कमळ चिन्ह दिसू लागेल. खरे तर या जिल्ह्य़ात कमळ चिन्ह एवढे दिवस कुपोषित होते. शिवसेनेचा जोर कायम होता. पाटील यांच्या समर्थकांनी मात्र ते पक्ष बदलणार असून विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघही बदलण्याचा विचार करत असल्याचा दावा केला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्य़ातील तुळजापूर हा एकमेव मतदारसंघ युतीमध्ये भाजपच्या वाटय़ाचा. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील गणिते लोकसभेच्या निवडणुकीनंतर बदलतील, असे सांगण्यात येत आहे. कारण ओम राजेनिंबाळकर यांना उस्मानाबाद आणि कळंब या दोन तालुक्यांत राणा जगजीतसिंह पाटील यांच्यापेक्षा ८४१२ मते अधिक मिळाली होती. भाजपमधील काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात कडवी झुंज दिली होती. सहकार क्षेत्रातील पद्मसिंह पाटलांचे वर्चस्व कमी व्हावे म्हणून अ‍ॅड्. मिलिंद पाटील यांनी एकेकाळी जिवाचे रान केले होते. आता त्यांच्या चिरंजीवांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा का, असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्या वेळी झुंज देणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजप नेतृत्वाने काहीएक विचारले नाही. बदललेल्या राजकीय स्थितीत राणा जगजीतसिंह पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास हरकत नाही, अशी भूमिका स्थानिक नेतृत्वानेही घेतली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी म्हणाले, जिल्हापातळीवर याबाबतची चर्चा झालेली नाही. मात्र, प्रदेशस्तरावरून घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे.

..तर मतदारसंघांच्या अदलाबदलीचा पेच

राणा जगजीतसिंह पाटील भाजपामध्ये आले तर त्यांना उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविता येणार नाही. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवसेना मतदारसंघावरील दावा सोडणार नाही. लोकसभा निवडणुकीतील आघाडी हे त्याचे प्रमुख कारण आहे. या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला एक लाख तीन हजार १७९, राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे राणा जगजीतसिंह पाटील यांना ९४ हजार ७६७ आणि वंचित बहुजन आघाडीला २२ हजार ५८ मते मिळाली होती. ही मतांची आघाडी लक्षात घेता त्यांना मतदारसंघ बदलावा लागेल. तो तुळजापूर असू शकतो, असा दावा केला जात आहे.

अद्याप कोणताही निर्णय मी घेतलेला नाही.

– राणा जगजीतसिंह पाटील, राष्ट्रवादी आमदार व माजी राज्यमंत्री

First Published on August 13, 2019 1:47 am

Web Title: ncp mla rana jagjit singh patil eager to join bjp abn 97
Just Now!
X