राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे माजी आमदार राम शिंदे आणि अपक्ष आमदार रोहित पवार यांनी त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एम. गव्हाणे यांनी आमदारासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी विद्यमान आमदार राम शिंदे यांचा पराभव केला आहे. रोहित पवार यांच्या निवडीला राम शिंदे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. निवडणूक प्रचारादरम्यान रोहित पवार यांनी भ्रष्ट पद्धतींचा अवलंब करीत मतदारांना लाच दिली, असा आक्षेप शिंदे यांनी घेतला आहे.

काय आहेत आरोप?
विधानसभा निवडणूक प्रचारात विद्यमान आमदार राम शिंदे यांची बदनामी करणे आणि निवडणूक खर्चाचा तपशील लपविल्याचा आरोपही रोहित पवार यांच्यावर करण्यात आला आहे. त्याशिवाय रोहित पवार यांच्या प्रचारासाठी बारामती ‘अॅग्रो लिमिटेड’च्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देऊन कर्जत जामखेड मतदारसंघात पाठविले होते. या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन मतदारांना प्रत्येकी १००० रुपयांची लाच देऊन रोहित पवार यांना मत देण्यास प्रलोभन केले, असाही आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. या प्रकरणात काही कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद आहे. ‘सोशल मीडियावर राम शिंदे यांची बदनामी करणारे संदेश पाठविण्यात आले. कर्मचाऱ्यांवर प्रचारासाठी केलेल्या खर्चाचा तपशील लपवून ठेवण्यात आला आहे,’ असाही आरोप आहे.