औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून आता जाहीरपणे मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणी लावून धरली जात आहे. त्यासाठी भाजपमधील पक्षीय पातळीवरील धोरणाचे उदाहरण व अडीच वर्षांनंतर राज्याच्या मंत्रिमंडळातही खांदेपालट करता येण्यासारख्या विचारांची मांडणीही केली जात आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासमोरच मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी स्वत:सह पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी अशी आग्रही मागणी केली. ‘‘तुम्हीच हे करू शकता,’’ असे विधानही काळे यांनी केले.

महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात शनिवारी सायंकाळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात आमदार सतीश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम, शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा गौरव समारंभ समितीचे निमंत्रक डॉ. राजेश करपे यांनी काहीशा अडखळत सतीश चव्हाण हे सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताने निवडून आल्यामुळे त्यांची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागावी, अशी मागणी केली. भाजपमध्ये नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील हे पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले आमदार असताना त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती, असेही करपे म्हणाले. करपे यांच्यानंतर शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी आपणही सलग तीन वेळा निवडून आल्यामुळे आपल्यासह सतीश चव्हाण यांनाही मंत्रिमंडळात काम करण्याची जबाबदारी सोपवावी, अशी थेटपणे मागणी केली. प्रा. डॉ. करपे हे काहीसे भीत-भीत चव्हाणांसाठी आग्रह करत असल्याचा संदर्भ जाहीरपणे बोलून दाखवत आपण थेट मागणी करत असल्याचे आमदार काळे म्हणाले. भाजपमध्ये जसे पदवीधर, शिक्षक मतदार संघातील आमदारांना मंत्री केले जाते तसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही करावे. हवे तर अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळात खांदेपालट करून आम्हाला संधी द्यावी, असा विचारही आमदार काळे यांनी मांडला. लोकसभा, विधानसभा मतदार संघातील मतदारांपेक्षा शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदार हा बुद्धिवंत व विचारवंत असल्यामुळे त्यांच्यातून निवडून येण्यासाठी आम्हाला बरीच कसरत करावी लागते. लहान-सहान सुख-दुखात सहभागी व्हावे लागते, असे सांगून आमदार काळे यांनी मराठवाडय़ातील संपूर्ण आठ जिल्हे व ७८ तालुके भौगोलिकदृष्टय़ा कार्यक्षेत्र असलेल्या मतदार संघातून निवडून येणे अवघड असल्याचे सांगत आमदार काळे यांनी आमदार चव्हाणांसह स्वत:चीही मंत्रिमंडळात वर्णी लागावी, अशी जोरदारपणे मागणी केली.

खासदार सुप्रिया सुळे या काय बोलतात, याकडे संपूर्ण सभागृहाचे लक्ष लागले होते. तत्पूर्वी मंत्रिमंडळात घेण्यासाठीची मांडणी होत असताना खासदार सुळे या बराच वेळ फोन आल्यामुळे मंचापासून दूरही झाल्या होत्या. मात्र, जेव्हा त्या विचार मांडण्यासाठी आल्या तेव्हा त्यांनी मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणीचा संदेश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार या श्रेष्ठींपुढे मांडला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, आमदार चव्हाण आणि आमदार काळे यांना मंत्रिमंडळात घेण्याबाबत एक अडचण असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. दोघांचीही वर्णी लावायची म्हटले तर त्यांना शिक्षण खाते द्यावे लागेल. आणि शिक्षण खाते तर सध्या काँग्रेसकडे आहे. तरीही त्यातून काही मार्ग काढता येतो का, हेही पाहू, असेही त्या म्हणाल्या.