राष्ट्रवादीला लोकसभेसाठी औरंगाबाद हवे!

औरंगाबाद : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीतील लोकसभा निवडणुकीच्या जागांबाबत सुरू असणारी चर्चा अंतिम टप्प्यात असून उद्या (बुधवारी) काही जागांच्या अदलाबदलीवरही चर्चा केली जाणार आहे. यामध्ये औरंगाबाद आणि जालना या मराठवाडय़ातील जागांचाही समावेश आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा, अशी मागणी होत आहे. काही कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचे नावही सुचविले आहे. उद्या होणाऱ्या आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा केली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. एका बाजूला औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मागण्याची तयारी सुरू असतानाच जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय मात्र होऊ शकलेला नाही. हा निर्णय कधी घेतला जाईल, याविषयी विचारणा केली असता जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक मतमतांतरे आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशीही या अनुषंगाने चर्चा झाली आहे. लवकरच निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सातत्याने काँग्रेसचा पराभव होत असल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी, अशी मागणी जाहीरपणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामकृष्णबाबा पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीतील नेत्यांनीही पक्षात यासाठी जोर लावला आहे. ‘मला भेटलेल्या काही कार्यकर्त्यांनी जागांची अदलाबदल व्हावी, अशी मागणी केली होती. त्यात औरंगाबाद आणि जालन्याचा उल्लेख होता. त्या अनुषंगाने चर्चा केली जाईल,’ असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सातत्याने शिवसेना निवडून येत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना नेहमीच ‘अवघड’ वाटतो. या पाश्र्वभूमीवर नव्याने व्यूहरचना केली जात आहे. राज्यातील इतर राज्यांच्या बाबतीत सुरू असणारी बोलणी या आठवडय़ात पूर्ण होईल, असे पाटील म्हणाले.

आंबेडकरांच्या आघाडीचा भाजपाला फायदा

काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बोलणी होऊन त्यांची आपसात आघाडी झाली तर राष्ट्रवादीचा त्यास आक्षेप असणार नाही. मात्र, एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांची आघाडी झाली तर त्याचा लाभ सत्ताधारी भाजपला होऊ शकतो, हे जाणण्याइतपत त्या दोन्ही पक्षांचे समर्थक हुशार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे त्यांच्या आघाडीवर लगेच बोलणे योग्य होणार नाही. मात्र, या दोन्ही पक्षांच्या समर्थकांना चांगले माहीत आहे की, असे केल्यास भाजपला मदत केल्यासारखे होईल.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत काँग्रेस

१९८० साली काजी सलीम आणि १९९८ साली रामकृष्णबाबा पाटील यांनी काँग्रेसकडून विजय मिळवला होता. तेव्हा त्यांना अनुक्रमे ४५.८ आणि ६१.४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सलग हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. १९९९ मध्ये ए. आर. अंतुले, रामकृष्णबाबा पाटील यांच्यासह नितीन पाटील यांच्यापर्यंत सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला होता. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेतेही जागा सोडण्यास तयार नाहीत. एल्गार यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनीच आमदार सुभाष झांबड लोकसभेचे उमेदवार असतील, असे संकेत कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे ही जागा अदलाबदलीत राष्ट्रवादीला सुटली नाही का, असे विचारले जात होते. या अनुषंगाने खुलासा करताना जयंत पाटील यांनी जागा अदलाबदलीवर बुधवारी चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले.