राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार विरोधातील मोहीम अधिक आक्रमक केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यावरील खड्डयांवरून खासदार सुप्रिया सुळेंनी भाजप सरकार आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात ‘सेल्फी’ मोहीम उघडलेली असताना आता विद्यार्थी प्रश्नावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात होणाऱ्या दिरंगाईकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी औरंगाबादमधील क्रांती चौकात ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात आलं.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रश्नासंदर्भात समाज कल्याण विभागाला निवेदन देण्यात आलं. मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. क्रांती चौकात हे आंदोलन करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शहरातून रॅली काढण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थींनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. तात्काळ विद्यार्थ्यांची ईबीसी आणि अन्य शिष्यवृत्त्यांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.