कुलगुरू डॉ. चोपडे यांचे आवाहन
मराठवाडा ही संत-महंत व कलावंतांची भूमी असून गुणवत्तेची येथे वानवा नाही. या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे माझे स्वप्न साकारण्यासाठी तुम्हा सर्वाची साथ हवी आहे, असे आवाहन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्त शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नागरी सत्कार व ग्रंथ प्रकाशन सोहळा शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा. रावसाहेब कसबे यांनी ग्रंथ संपादित केला आहे. या पुस्तकात डॉ. चोपडे यांचे सहकारी, प्राध्यापक, अधिकारी व मित्र यांनी लिहिलेल्या ५१ लेखांचा समावेश आहे.
महात्मा गांधी मिशनच्या रुख्मिणी सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा पद्मश्री फातेमा झकेरिया होत्या. कार्यक्रमास माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख, प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे, डॉ. पी. एम. जाधव, मुकुंद कुलकर्णी, प्रा. मुनीष शर्मा, माजी मंत्री गंगाधर गाडे, ‘एमजीएम’चे विश्वस्त अंकुश कदम, संयोजक डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. शंकर अंभोरे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी कुलगुरू चोपडे व नलिनी चोपडे यांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन न्या. देशमुख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सत्कारानंतर कुलगुरू म्हणाले, आपल्याला केंद्रीय विद्यापीठात कुलगुरुपदाची संधी मिळाली होती. तथापि बाबासाहेबांच्या नावाने कार्यरत असलेल्या या विद्यापीठात व मराठवाडय़ासाठी मला काम करावयाचे होते. दोन वर्षांपासून एक ध्येय घेऊन आपण काम करीत आहोत.