पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘दयावान’ असा उल्लेख करीत, बिहारप्रमाणे महाराष्ट्रालाही आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. ‘दयावान’ या शब्दातून उपहासाची छटा जाणवेल, असे त्याचे उच्चारण होते. तातडीने दुष्काळ जाहीर करावा, असे सांगताना कर्जमुक्ती मागणीवरही शिवसेना ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली.
जिल्हय़ातील खुलताबाद येथे एक हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे, म्हणजे एक कोटी रुपयांचे मदत वाटप ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तेवढय़ाच किमतीच्या धान्याची मदत फुलंब्री तालुक्यात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी (दि. १४) जेलभरो आंदोलनाचे आयोजन केले आहे. या पाश्र्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे यांनी ‘जा! एकदा जेल बघून या,’ या शब्दांत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हिणवले.
औरंगाबाद जिल्हय़ातील शेतकऱ्यांना सरकारी योजनांची मदत व्हावी, म्हणून वैयक्तिक लाभाच्या २५ कोटींच्या योजनांचा ६२ लाखांहून अधिकचा लोकवाटा शिवसेना भरणार आहे. त्यामुळे सुमारे १३ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. या बरोबरच शेतकऱ्यांच्या मुलींचे सामुदायिक विवाह करण्यासाठी ‘शिवसेनाप्रमुख कन्यादान योजना’ही पक्ष सुरू करीत आहे. विवाहासाठी लागणारा सर्व खर्च शिवसेना करेल, असेही त्यांनी सांगितले.
मराठवाडय़ात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता मदत देण्याची गरज आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी, बिहारसाठी सव्वालाख कोटी रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दिली. आता त्यांनी महाराष्ट्रालाही भरीव मदत द्यावी, अशी मागणी केली. मात्र, हाच विषय कार्यकत्ऱ्यांच्या बठकीत मांडताना पंतप्रधानांचा उल्लेख त्यांनी ‘दयावान’ असा केला. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, पालक मंत्री रामदास कदम, दिवाकर रावते, दादा भुसे, दीपक केसरकर, खासदार चंद्रकांत खरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आदींची उपस्थिती होती.
‘योजनांची अंमलबजाणी करावी’
मुख्यमंत्री मराठवाडय़ात आले. त्यांनी अनेक घोषणा केल्या; पण अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी सांगितले. बीड जिल्हय़ातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. याचे कारण त्याच्याकडे खायला काही नव्हते. खरे तर २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ ही योजना पोहोचलीच नाही. सरकारने धान्य दिले, पण ते पोहोचलेच नाही. योजनांची अंमलबजावणी नीट व्हावी, या साठी आता पथके नेमली जाणार असून या पथकाच्या माध्यमातून जगण्याची उभारी शेतकऱ्यांमध्ये निर्माण केली जाईल. या साठी स्थापन होणाऱ्या उभारी पथकांसाठी शिवसेनेकडून प्रशिक्षणही दिले जाणार आहे.