दुष्काळामुळे मराठवाडय़ात गावोगावी नैराश्याचे वातावरण. नापिकीमुळे दारूची सवय आत्महत्येस पोषकता निर्माण करून देणारी, त्यावर आघात करता यावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनी गावागावातून किमान अवैध दारूची सहज उपलब्धता कमी व्हावी म्हणून ग्रामसभांनी अवैध दारूच्या विरोधात ठराव करावेत, असे आवाहन केले आणि ३ हजार २६३ गावांपैकी १ हजार ७४२ गावांनी ‘आमच्या गावातून अवैध दारू रोखा’, या आशयाचे ठराव दाखल केले आहेत. अवैध दारूबरोबरच परवानाधारक दुकानातून मिळणारीही दारू बंद करावी, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे ‘नाम’ संस्थेचे प्रमुख नाना पाटेकर यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
मराठवाडय़ात या वर्षांत २५३ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील ९३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे असल्याचे पुढे आले आहे. तर १०० प्रकरणांची चौकशी सुरू आहे. दररोज आत्महत्यांच्या आकडय़ांमध्ये वाढ होते आहे. ‘पुढील दोन महिने नाजूक आहेत. अघटीत करण्याची मनात इच्छा होईल, असेच वातावरण आहे. त्यात दारूची भर पडू देऊ नये, असे प्रयत्न सरकारने करायला हवेत, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केले. नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना किमान पाऊस पडेपर्यंत तरी बाजूला ठेवता आले तर बरे होईल, असे सांगत नाना पाटेकर म्हणाले, ‘सरकारने आता मिळणाऱ्या रेव्हेन्यूकडे जरा दुर्लक्ष करायला हवे. अगदी कायमस्वरूपी नाही पण पाऊस पडेपर्यंत मराठवाडय़ात सरकारने दारूबंदीचा प्रयोग हाती घ्यायला हवा.’
दारूबंदी आणि अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे. ‘नुसते ठराव’ करून भागणार नाही तर अवैध धंदे बंद करण्याची कारवाई तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी अवैध दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी पावले उचलली असली, तरी परवानाधारक दुकानातून होणारी विक्री थांबविणे आवश्यक बनले आहे. नापिकी कर्जबाजारीपणा आणि पाणीटंचाई यास वैतागलेला मराठवाडय़ातील माणूस कोणत्याही क्षणी दारूच्या दुकानात जातो. एकदा नशा झाली, की त्याचे स्वत:वरचे नियंत्रण संपते. त्यामुळे आत्महत्यांच्या शक्यता वाढतात, असे डॉक्टरांचेही म्हणणे आहे. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉ. प्रतिभा फाटक म्हणाल्या, ‘१५ ते ४५ वयोगटातील तरुणांवर लक्ष केंद्रित करून किमान त्यांना तरी व्यसनापासून दूर ठेवता येईल काय, यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, संपूर्ण दारूबंदी झाली तर त्याचा एकूणच समाजजीवनावर चांगला परिणाम दिसून येईल. आत्महत्यांपूर्वी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे निराश असणारा शेतकरी बऱ्याचदा व्यसनांचा आधार घेतो, हे सव्र्हेक्षणातून दिसून आले आहे. त्यामुळे किमान पाऊस पडेपर्यंत तरी दारूबंदीची आवश्यकता आहे.