खुलताबाद तालुक्यात नवीन प्रयोग
पाणी अडविण्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विविध प्रयोग सुरू असतानाच काही नवे प्रयोग हाती घेतले जात आहेत. ‘दिलासा’ या यवतमाळमधील संस्थेच्या वतीने खुलताबाद तालुक्यातील फुलमस्तान नदीवर नव्या पद्धतीचा नळकांडी बंधारा बांधण्यात आला आहे. पाण्याचा वेग कमी करण्याचे काम या बंधाऱ्याच्या माध्यमातून केले जाऊ शकेल, असा दावा पाणी क्षेत्रात काम करणाऱ्या आनंद आसोलकर यांनी केला आहे.

फुलमस्तान व गिरिजा नदीच्या पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण व पाणलोट विकासाचे उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हाती घेण्यात आले आहेत. जलयुक्त शिवारच्या या कार्यक्रमात आता काही नवीन प्रयोगही हाती घेतले जात आहेत. सिमेंटच्या नळकांडीचा बंधारा हा त्याचाच भाग आहे. नदी पात्र रुंद करताना काही भाग खोल करून तेथे चर घेतला जातो. पात्रात किती पाणी येऊ शकते व पाण्याचा दाब किती असेल, याचा अभ्यास करून बंधाऱ्याची जागा ठरविले जाते. खणलेल्या चरात मातीचा भराव टाकून तो धुमसून घेतला जातो. पाणी पूर्णत: अडून न राहता काही वेळ ते थांबवून धरता यावे, जेणेकरून पाणी पाझरण्याची प्रक्रिया होऊ शकेल. यासाठी पुलाखाली वापरल्या जाणाऱ्या सिमेंट नळकांडय़ा चर खणलेल्या भागात उभ्या रोवल्या जातात. या नळकांडय़ांमध्ये माती भरली जाते. त्यावर नंतर सिंमेटचा स्लॅब टाकला जातो. ज्यामुळे पाणी बंधाऱ्यावरून वाहिले तरी पाण्याचा दाब त्यास सहन होईल. हा बंधारा बांधण्यास अद्याप शासन मान्यता नाही, पण एक प्रयोग म्हणून हा बंधारा सुरू करण्यात आला आहे.

या प्रयोगाचे काम हाती घेणारे जलक्षेत्रात काम करणारे आनंद असोलकर सांगतात, अलिकडे पाणी अडविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. काही ठिकाणी पाण्यात टायर टाकून बंधारे उभे केले जात आहेत. प्रकाश आमटे यांनी असे काही प्रयोग केले आहेत. मात्र, टायरमुळे पाण्यावर काही परिणाम होतात का, याचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे सिंमेटच्या नळकांडय़ाचा हा प्रयोग करून पाहण्याचे ठरले. खुलताबाद तालुका कृषी अधिकारी देवळाणकर यांनी साथ दिली आणि फुलमस्तान नदीवर हा प्रयोग हाती घेण्यात आला. हा बंधारा सिमेंट बंधाऱ्यापेक्षा कमी पशात होतो.

नळकांडी पुलासाठी लागणाऱ्या सिमेंटच्या नळकांडय़ा साधारण साडेसात हजार रुपयांना मिळतात. पाच ते सात नळकांडय़ा एकमेकांना चिकटून उभ्या केल्या की, सहजपणे हा बंधारा उभा राहतो. या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला गॉबियन पद्धतीने दगड रचून त्यावर लोखंडी जाळी टाकली जाते. पाणी वाढले तर एखादे नळकांडे दूर फेकले जाऊ शकते. ते पुन्हा बसविण्यासाठीही फारसा खर्च येत नसल्याचा दावाही कृषी विभागातील अधिकारी करतात. पाणी अडविण्यासाठी विविध प्रकारचे बंधारे केले जात आहेत. मात्र, पाण्याची गती कमी करण्यासाठीचा हा नवोक्रम लक्ष वेधून घेत आहे. या बंधाऱ्यासाठी लागणारा खर्च आमदार प्रशांत बंब यांनी दिला आहे. या बंधाऱ्याची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी यांनी नुकतीच केली. केवळ नाला सरळीकरण आणि रुंदीकरणावर भर न देता पाणलोटातील इतर कामे करणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

फुलमस्तान व गिरिजा नदीवर ६७ किलोमीटरवर नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाची कामे हाती घेतली जाणार असून त्यासाठी १ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मावसाळा, खिर्डी, बांदलाबाई, सालुखेडा, साराई, भडजी, सोनखेडा या ठिकाणी कामे हाती घेतली जाणार असून २९ गावांना त्याचा लाभ होईल, असे सांगितले जाते.