22 September 2020

News Flash

लातूर राखण्यासाठीच रेल्वे प्रकल्प

सर्व सत्तास्थाने पटकाविल्यानंतर प्रभाव कायम ठेवण्यासाठी भाजपची खेळी

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सर्व सत्तास्थाने पटकाविल्यानंतर प्रभाव कायम ठेवण्यासाठी भाजपची खेळी

लातूर येथे रेल्वेच्या कोच तयार करण्याचा कारखाना करण्यासंबंधी भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र शासनाचा करार नुकताच झाला. प्रत्यक्ष ३० हजार रोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणात वाढतील, असा सरकारचा दावा आहे. पहिल्या टप्प्यातील रोजगाराचा आकडा दहा हजार एवढा आहे. रेल्वे कोच उभारणीच्या या प्रयत्नाचे मराठवाडय़ातून स्वागत होत आहे, मात्र लातूर हे ठिकाण केंद्र सरकारने का निवडले असावे याची काही राजकीय कारणेही आहेत. लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला; पण अलीकडे भाजपला महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यश मिळाले. तत्पूर्वी लातूर लोकसभा मतदारसंघातही भाजपचा झेंडा फडकला. या सर्व राजकीय प्रक्रियेमागे संघपरिवाराची शक्ती होती. ही ताकद वाढत राहावी, असा संदेश देणारा राजकीय निर्णय म्हणूनही रेल्वे कोच निर्मितीच्या कारखान्याच्या घोषणेकडे पाहिले जात आहे.

लातूरचा राजकीय इतिहास तसा काँग्रेसमय वाटावा असाच. १९८० ते १९९९ या कालावधीमधील सात निवडणुकांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी यश मिळवले. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील उमरगा हा तालुका लातूर लोकसभा मतदारसंघात असे. तेथील आमदार बसवराज पाटील हे चाकूरकरांचे कट्टर समर्थक. या मतदारसंघातील जातीय समीकरणामुळे चाकूरकरांना नेहमी लाभ झाला. त्यांना धक्का बसला तो १९९९ मध्ये. रूपाताई पाटील निलंगेकर या मतदारसंघातून निवडून आल्या. तेव्हा भाजपचे नेतृत्व गोपीनाथ मुंडे करीत होते. काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख आणि मुंडे यांच्यातील ‘मैत्रभावने’तून अनेक घडामोडी घडत गेल्या. भाजपला यश मिळाले. तत्पूर्वी भाजपचा उमेदवार हरण्यासाठी उभा असतो असा संदेश मतदारांपर्यंतही पद्धतशीरपणे गेला होता. डॉ. गोपाळराव पाटील हे पराभवासाठी उभे असतात, असा भाजप कार्यकर्त्यांचाही समज होता. लातूर विधानसभा मतदारसंघात तर भाजपला यश मिळणे तसे अवघडच होते. भाजप-काँग्रेसचा अलिखित करार असल्यासारखे वातावरण राजकीय पटलावर होते. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर तसेच भाजपच्या नव्या रचनेमध्ये ‘काँग्रेसमुक्त’ची घोषणा झाली. पालकमंत्रिपदाची सूत्रे पंकजा मुंडे यांच्याकडून संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे आली आणि भाजप नव्या रूपात पुढे आली. याच काळात दुष्काळ पडला. थेट रेल्वेने पाणी देण्याची संधी सरकारला मिळाली आणि त्या जोरावर लातूर महापालिका व जिल्हा परिषदेमध्ये नव्या राजकीय घडामोडी घडल्या. भाजपचे कमळ लातूरमध्ये फुलले. तत्पूर्वी काँग्रेस पक्षाचे किती प्राबल्य असेल? कोल्हापूरच्या जयवंत आवळे यांना खास लातूरमध्ये विलासरावांनी बोलावले आणि त्यांच्या शब्दाखातर मतदारांनी आवळे यांना निवडून दिले. त्यानंतर मात्र काँग्रेसची लोकसभेतील गणिते बदलू लागली. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे डॉ. सुनील गायकवाड निवडून आले. आता भाजपचा प्रभाव कायम आपल्याकडे राहावा, या भूमिकेतून रेल्वे कोच निर्मिती कारखान्याच्या घोषणेकडे पाहिले जात आहे.

निवडणुकीचे समीकरण

लातूर विधानसभा मतदारसंघात भाजपला यश मिळालेले नाही. राजकीय इतिहासामध्ये ‘मामुली’ चुकीचा फटका माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना बसला होता. तो अपघात वगळता काँग्रेसला या मतदारसंघात पराभूत करणे अवघड असल्याचे भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही ठाऊक आहे. मात्र, वाढणारी राजकीय ताकद अधिक संघटित केली तर हा गडही पडू शकतो, हेही त्यांना कळाले आहे. खरे तर लातूर शहरात एके काळी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे मोठे कौतुक सर्वाना होते. विकासामध्ये आपला नेता ‘सारे काही लातूरला आधी’ ही नीती अवलंबत असल्याने त्यांच्यामागे जनता उभी राहिली. त्यांच्या पुण्याईवर त्यांचे चिरंजीव अमित देशमुखही निवडून आले. मात्र, महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना हादरा बसल्यानंतर त्यांना पराभूत करायचे असेल तर एक मोठा प्रकल्प लातूरमध्ये उभा करणे आवश्यक होते. रेल्वे बोगी निर्माण करण्याची घोषणा त्याच राजकीय खेळीचा भाग असल्याचेही सांगण्यात येते. भूकंपानंतर लातूर जिल्ह्य़ात राष्ट्रीय स्वयंसेवक संघपरिवारातील कार्यकर्त्यांनी मोठे कार्य उभे केले. कार्यकर्त्यांची संख्या वाढत होती. हे सर्व कार्यकर्ते तेव्हा लातूरव्यतिरिक्त इतर जिल्ह्य़ातील कामांमध्येही प्रामुख्याने दिसत. आजही अधिकारपदावरील कार्यकर्त्यांची संख्या लातूरमध्ये अधिक आहे. या पाश्र्वभूमीवर रेल्वे कोच घोषणेकडे पाहिले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2018 1:55 am

Web Title: new railway project in latur from bjp
Next Stories
1 बारावीच्या परीक्षेसाठी जाताना दोघांचा अपघाती मृत्यू
2 दूर गेली शाळा.. पटसंख्येचा मार चिमुकल्या जीवांना
3 औरंगाबादेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; उप कुलसचिवांना अटक
Just Now!
X