10 April 2020

News Flash

जम्मू-काश्मीर-लडाखचा नवा प्रमाणित नकाशा मराठीत

भारत सरकारने नावांमध्ये केलेले हे बदल नकाशामध्ये जशास तसे वापरावे लागतात. नवा निर्णय झाला की तसे बदलही नकाशांमध्ये करावे लागतात.

(संग्रहित छायाचित्र)

नकाशातज्ज्ञ पंडितराव देशपांडे यांचे कार्य, गोविंद देशपांडे स्मृती पुरस्काराने लवकरच गौरव

३७० कलम रद्द झाले आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येत वाढ झाली. राज्यांची संख्या २९ वरून २८ वर आली आणि भारतात आठ केंद्रशासित प्रदेश झाले. पण त्याचे नकाशे मराठीत उपलब्ध नव्हते. औरंगाबादच्या पंडितराव देशपांडे यांनी त्यादृष्टीने तयार केलेल्या नव्या नकाशाला भारत सरकारच्या सव्‍‌र्हे ऑफ इंडिया या संस्थेने प्रमाणित केले असून या नकाशात अलिकडेच झालेले बदलही आवर्जून नोंदविण्यात आले आहेत. येत्या सोमवारी प्रमाणित नकाशाच्या मुद्रित प्रती उपलब्ध होऊ शकणार आहेत. नकाशाच्या क्षेत्रात गेली ३४ वर्षे काम करणाऱ्या पंडितराव देशपांडे यांना औरंगाबाद येथील गोविंद देशपांडे स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

नकाशा तयार करणे हे तसे जिकिरीचे काम. देशाची सीमारेषा आणि सागरी सीमारेषा नीटपणे काढल्या गेल्या आहेत की नाही याचे डेहराडूनमधील सव्‍‌र्हे ऑफ इंडियाच्या कार्यालयाकडून प्रमाणीकरण केले जाते. सर्वसाधारणपणे या क्षेत्रात हिंदी भाषिक आणि विशेषत: दिल्लीतील प्रकाशक आणि विक्रेते काम करतात. उस्मानिया विद्यापीठात तत्त्वज्ञानाची पदवी मिळविल्यानंतर सहा वर्षे प्राथमिक शाळेत  नोकरी करणाऱ्या पंडितराव देशपांडे यांनी नकाशे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. तेव्हा हिंदी पट्टय़ातील प्रकाशकांनी प्रमाणित केलेल्या नकाशातही मराठी गावांची नावे, जिल्ह्य़ांची नावे याची चुकीची माहिती असायची. याचे कारण भाषेतील उच्चारांमध्ये दडलेले असे. यावर मात करण्यासाठी आपणच नकाशा काढून पाहूयात, असा प्रयोग पंडितराव यांनी १९६४ मध्ये केला आणि आज भारतातील अगदी नवीन बदलांसह त्यांनी केलेल्या नकाशांना प्रमाणित केले जात आहे. पूर्वी सात केंद्रशासित प्रदेश होते. आता जम्मू काश्मीर आणि लडाखचा समावेश त्यात झाल्यामुळे आणि त्याच्या सीमारेषा ठरल्यामुळे नकाशातही बदल होत गेले. तो बदललेला नकाशा प्रमाणित करून घेण्यासाठी बराच कालावधी जातो. लष्कराच्या व्यवस्थापनापासून ते सव्‍‌र्हे ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनापर्यंत त्याचे मुद्रितशोधन करून घ्यावे लागते. सीमारेषा ठरवून घ्याव्या लागतात. अलिकडेच २६ जानेवारी रोजी दादरा-नगर-हवेली हा एक केंद्रशासित प्रदेश झाला. पूर्वी ‘हवेली’ नकाशात वेगळे दाखविले जात असे. काही प्रदेशांची आणि राज्यातील जिल्ह्य़ांची नावेही बदलली जातात. अलिकडच्या काळात कर्नाटकातील बऱ्याचशा जिल्ह्य़ांच्या नावांमध्ये बदल झाले. अंदमान निकोबारमधील रॉस द्वीपचे नाव आता नेताजी सुभाषचंद्र द्वीप असे झाले आहे. तर नील द्वीपचे नाव आता शहीद द्वीप झाले आहे. हॅवलॉक द्वीपला आता द्वीपसमूह म्हटले जाते. भारत सरकारने नावांमध्ये केलेले हे बदल नकाशामध्ये जशास तसे वापरावे लागतात. नवा निर्णय झाला की तसे बदलही नकाशांमध्ये करावे लागतात.

कार्याचा सन्मान

वेगवेगळ्या कारणांसाठी नकाशे लागतात. पण महाराष्ट्रातील भूगोलाचे शिक्षक नकाशा वाचन शिकविण्याकडे कमालीचे दुर्लक्ष करतात, असे देशपांडे यांना वाटते. रस्त्यांमध्ये झालेले बदलही बऱ्याचदा नोंदवावे लागतात. अलिकडच्या काळात समुद्रापर्यंतचे मार्ग विकसित करण्यावर केंद्र शासनाचा भर असल्याचे दिसून येते, असेही देशपांडे यांचे निरीक्षण आहे. उदाहरणार्थ- जळगाव-औरंगाबाद-नगर- पुणेमार्गे दिघी बंदरापर्यंत जाणारा रस्त्याचा क्रमांक ७५३ झाला आहे. तर पूर्वी सोलापूर-धुळे हा २११ क्रमांकाने ओळखला जाणारा रस्ता आता ५२ क्रमांकाने ओळखला जावा, असे सरकारने ठरविले आहे. हे बदल नकाशात नोंदवून रस्त्यांचे नकाशे नेहमी काढावे लागतात. नकाशांच्या दुनियेत असे लहान वाटणारे बदल अचूकपणे नोंदविणाऱ्यांमध्ये पंडितराव देशपांडे यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो. महाराष्ट्रात अशा प्रकारे काम करणारे ते एकमेव  आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल २८ मार्च रोजी कलश मंगल कार्यालयात त्यांना गोविंद सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2020 1:08 am

Web Title: new standardized map of jammu and kashmir ladakh in marathi abn 97
Next Stories
1 औरंगाबाद जळीतकांडातील महिलेचा मृत्यू
2 मराठवाडय़ात शेतकरी आत्महत्यांमध्ये तिपटीने वाढ
3 मनपा आरक्षण सोडतीनंतर गल्लोगल्ली ‘कारभारी’ होण्याची घाई
Just Now!
X