सुहास सरदेशमुख

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भाजी बाजारातील गर्दीवर औरंगाबादच्या कृषी विभागाने उत्तर शोधले आहे. शहरातील मोठय़ा गृहनिर्माण संस्थांना लागणारा भाजी आणि फळांचा पुरवठा करण्यासाठी गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड आणि वैजापूर येथील ३३ शेतकरी गटांना शहरातील सुमारे ४० हून अधिक मोठय़ा सोसायटय़ांना जोडून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे टाळेबंदीच्या काळातील व्यवसायात चार लाख ८९ हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. भाजी आणि फळांची विक्री करण्यापूर्वी कोणाचाही थेट हात भाज्यांना लागणार नाही अशी काळजी घेतली आहे. हातमोजे आणि गाऊनसह विशेष  काळजी घेतली जात असल्याचा दावा केला आहे. हा सगळा व्यवहार समाजमाध्यमांमध्ये गट तयार करून करण्यात आला. कृषी विभागातील चार अधिकारी या कामासाठी संपर्क अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत.

शहरातील कोणत्या तरी कोपऱ्यात फळे विक्रेते दुकान थाटतात. तसेच भाजीसाठी होणारी गर्दी करोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरू शकेल, अशी भीती सर्वत्र व्यक्त होत होती. त्यावर उपाय करण्याचे जिल्हा कृषी अधिकारी मोटे यांनी ठरविले. भाजी आणि फळ विक्रेत्या उत्पादक शेतकरी गटांमार्फत विक्री करण्याचे नवे प्रारूप विकसित करण्यावर भर देण्यात आला. असे करण्यापूर्वी भाजी कशी निवडायची? कोणत्या प्रमाणात किती भाज्या, त्याची किंमत यावरही चर्चा करण्यात आली. तसेच द्राक्ष आणि मोसंबी या फळांना सध्या बाजारपेठ नसल्याने त्याच्या किमतीही घसरणीला लागलेल्या आहेत. या स्थितीमध्ये एकत्रित फळे आणि भाजी विक्रीसाठी पिशवी तयार करण्यात आली. गंगापूर तालुक्यातील आठ-नऊ शेतकऱ्यांची कृषी उत्पादक कंपनी होती. प्रसंगी शेतीमाल विकला गेला नाही तरी चालेल पण कोणीही अधिक माणसांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि पोलीस आयुक्तांनी या गाडय़ांच्या दळणवळणात कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली आहे.

या अनुषंगाने सामाज माध्यमांवर शेतकरी आता जाहिरातही करू लागले आहेत. सटाणा येथील शिवाजी घवाटे यांनी द्राक्षाच्या एक किलोपासून पाच किलोपर्यंतच्या पिशव्या केल्या आहेत. कोणत्या फळामध्ये कोणते जीवनसत्त्व यांचीही जाहिरात आता शेतकरी करत आहेत. विशेषत: रोग प्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वाची फळे विकत घ्या, असा आग्रह केला जात आहे. शेतकरी गट आणि भाजी याचे प्रमाण लक्षात घेता सोसायटींनी आणखी पुढाकार घ्यावा आणि एकत्रित घरपोच भाजी विकत घ्यावी. बाहेर गर्दी टाळावी, असे आवाहन कृषी विभागातील अधिकारी करत आहेत.

भाजी वाटपाचे सूत्र

जडगाव येथील शेतकऱ्यांनी मग विविध प्रकारची भाजी पिशवी तयार केली. शंभर रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंतच्या पिशवीमध्ये दररोज लागणारी भाजी पुरवठा करण्यात येतो. तसेच फळांचीही वेगळी पिशवी तयार करण्यात आली. गेल्या काही दिवसात मोठय़ा सोसायटय़ांच्या अध्यक्ष आणि सचिवांना जोडणारा एक वॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला. सोसायटीमधून होणारी एकत्र मागणी त्यांनी या ग्रुपवर नोंदविल्यानंतर गटामार्फत ती पुरविली जात आहे. विशेष म्हणजे एखाद्या शेतकरी गटाकडे एखादी भाजी उपलब्ध नसेल तर ती भाजी देण्याचा अंतर्गत व्यवहारही आता होऊ  लागला आहे.

भाजीसाठी गर्दी टाळता येणे शक्य आहे. आता जेवढे शेतकरी गट आम्ही कार्यरत केले आहेत. त्यांचा माल रोज शहरात आणायचा असेल तर सोसायटीच्या अध्यक्ष सचिवांनी पुढे येण्याची गरज आहे. माल उपलब्ध आहे. तो योग्य किमतीत आणि आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन आम्ही पोहचवत आहोत.

-डॉ. तुकाराम मोटे, कृषी अधिकारी