राज्यमंत्री सावे यांचा दावा

औरंगाबाद : शहरातील काही भागात आठ दिवसाला एकदा होणारा पाणीपुरवठा, बेरात्री होणारा पाणीपुरवठा यामुळे वैतागलेल्या औरंगाबादकरांना दिलासा देतो आहोत, असा विश्वास वाटावा म्हणून उद्योग राज्यमंत्री अतुल सावे गुरुवारी महापालिकेत पोहोचले. त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सांगितले, ‘दीड दिवसांत सर्व शहरात समान पाणीपुरवठा करा.’ शहराच्या प्रस्तावित नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करून घेतले जाईल. त्याच्या निविदा ६० दिवसांच्या आत निघतील यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

शहरातील पाणीपुरवठय़ाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. काही भागात १५ दिवस पाणी येत नाही. काही भागात रात्री दोन वाजता किंवा रात्री तीन वाजता पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नगरसेवकांच्या घरी नागरिकांची सकाळीच झुंबड उडालेली असते. सततच्या तक्रारी असल्याने राज्यमंत्री झाल्यानंतर सावे यांनी गुरुवारी महापालिका गाठली. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रस्तावित नव्या योजनेचे काम मंजूर करून त्याची निविदा प्रसिद्ध होईल, असे प्रयत्न सुरू झाले आहे. मात्र, येत्या १५ दिवसांत विधान परिषदेची निवडणूक लागणार असल्यामुळे त्याची आचारसंहिता लागेल. त्यामुळे भाजप-सेनेच्या नेत्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने सावे यांना विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हे काम होणार आहे. मंत्रालयात त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरात लवकर काम व्हावे, अशी आमची इच्छा आहे. निविदा प्रसिद्ध करण्याचा कालावधी ४५ दिवसांपर्यंत असावा, असे आम्ही ठरविले आहे. ६० दिवसांपर्यंत म्हणजे दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा समान व्हावा म्हणून बैठक घेण्यात आली आणि पुरवठय़ाचे नियोजन दीड दिवसाच्या आत पूर्ण केले जावे, अशा सूचना सावे यांनी दिल्या असल्याचे त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. ‘जी गोष्ट वर्षांनुवर्षे होऊ शकली नाही, ती दीड दिवसांत कशी होईल’ असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘एवढे दिवस शहर अभियंत्यांना या पाणी नियोजनात सहभागी करून घेण्यात आले नव्हते. त्यांना आता सहभागी करून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे समान पाणीपुरवठा व्हावा, अशी व्यवस्था प्रशासनाकडून होईल.’

भाजप सदस्यांमध्येच वाद

समान पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने सुरू असणाऱ्या बैठकीत भाजपचे दिलीप थोरात आणि प्रमोद राठोड यांच्यात वाद झाला. पाणीपुरवठा समान व्हावा म्हणून आम्ही राठोड यांना सहकार्य करत आहोत, असे दिलीप थोरात म्हणाले. यावरून एकमेकांना उलट-सुलट सुनावण्यात आले. शेवटी राज्यमंत्री सावे यांनी हस्तक्षेप करून दोघांनाही थांबविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीनंतर समान पाणीवाटपासाठी दोघेही बोलत होते, कोणताही वाद नव्हता, अशी सारवासारव सावे यांनी केली.

भाजपच्या मताला सेनेचा होकार

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नवीन पाणीपुरवठा योजना करणे म्हणजे महापालिकेवर एकप्रकारचा अविश्वास असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, महापौर नंदकुमार घोडेले यांनी ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करून घेण्यास कोणतीही हरकत नाही. सावे हे युतीचे नेते आहेत , त्यामुळे आमचा कोणताही आक्षेप नाही, असे घोडेले म्हणाले. महापालिकेकडून ‘त्यांचा घास’ काढून घेतला जात आहे का, असे विचारल्यानंतर सावे यांनी त्याच्यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.