31 May 2020

News Flash

‘वॉटरग्रीड’च्या पाण्याचा आराखडा बदलणार

वॉटरग्रीडच्या मूळ योजनेला अंतर्गत जल वितरण व्यवस्थेचा भागही नव्याने जोडावा लागणार आहे.

आता ‘५५ लिटर प्रतिदिन प्रतिव्यक्ती’ निकष

औरंगाबाद : मराठवाडय़ातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन आखण्यात आलेल्या वॉटरग्रीडच्या प्रतिलिटर प्रतिमाणसी ४० लिटरचा निकष आता बदलण्यात येणार असून तो ५५ लिटर असा केला जाणार आहे.

त्याचबरोबर केंद्र सरकारने ‘घर तेथे नळ’ हे धोरण हाती घेतले असल्यामुळे वॉटरग्रीडच्या मूळ योजनेला अंतर्गत जल वितरण व्यवस्थेचा भागही नव्याने जोडावा लागणार आहे. त्यामुळे प्रकल्प अहवालामध्ये मोठय़ा प्रमाणात बदल होऊ शकतात. मात्र, असे असले तरी प्रकाशित झालेल्या निविदांसाठी भारतीय कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अपरिहार्य स्थितीत इस्रायल, श्रीलंका या देशाने दोन टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासही सकारात्मकता दर्शविली आहे, असे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी सांगितले. औरंगाबाद येथे वॉटरग्रीडच्या अनुषंगाने त्यांनी बैठक घेतली.

औरंगाबाद जिल्ह्य़ासाठी २७६४ कोटी, जालन्या जिल्ह्य़ासाठी १५२९ कोटी, बीड जिल्ह्य़ासाठी ४८०२ कोटी रुपयांच्या वॉटरग्रीडसाठीच्या निविदा प्रकाशित झाल्या आहेत. लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्य़ाची अंदाजपत्रके तयार केली जात असून त्याच्या निविदा लवकरच निघतील. मात्र, एका बाजूला ही प्रक्रिया सुरू असतानाच केंद्र सरकारने ‘घर-घर जल’ असे घोषवाक्य ठरविले असल्यामुळे अंतर्गत जलवितरणाचा कार्यक्रमही वॉटरग्रीडमध्ये समाविष्ट केला जाणार आहे. पूर्वी ही योजना धरणांमधील पाणी गावातील टाक्यांपर्यंत पोहोचविण्यापर्यंत मर्यादित होती. त्याची व्याप्ती आता वाढणार आहे. गावोगावी अंतर्गत वितरण व्यवस्था ग्रामपंचायतींमार्फत केली जात असे. ती यापुढे एखाद्या विभागाच्या हातात जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचाही समावेश या योजनेत व्हावा, अशी सूचना लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना केली.

दरम्यान, सत्ता स्थापन होण्यापूर्वी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी घेतलेली बैठक चर्चेची ठरली. याच खात्यात पुढेही काम करायला आवडेल, असे बबनराव लोणीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पाणीपुरवठय़ाची विभागणी:

औरंगाबाद जिल्ह्य़ाचा पाणीपुरवठा चार क्षेत्रात विभागण्यात आला असून अशुद्ध पाणीपुरवठय़ाची जलवाहिनी १९३ कि.मी.च्या जवळ असून ४९० कि.मी.ची जलवाहिनी शुद्ध पाण्याची असेल. चार जलशुद्धिकरण केंद्र असून ३९६ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी शुद्धीकरणाची त्याची क्षमता असेल. प्रत्येक गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी १४ बुस्टर पंप प्रस्तावित असून त्याची किंमत २७६४ कोटी १९ लाख एवढी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2019 3:51 am

Web Title: news about water grid project in marathwada zws 70
Next Stories
1 औरंगाबादेत बनावट नोटांची निर्मिती, नाशिक, मालेगावात चलनात
2 औरंगाबादेत बनावट नोटा केल्या जप्त, तीन जण गजाआड
3 परतीच्या पावसामुळे फळबागांचेही नुकसान
Just Now!
X