गडकरींच्या तरतूद वाढविण्याच्या सूचनेनंतर मुनगंटीवारांचा खुलासा

तेलंगणामध्ये पाण्याशी संबंधित सर्व योजनांची तरतूद एकत्रित दाखविली जाते. महाराष्ट्रात मात्र वेगवेगळ्या तरतुदी केल्या जातात. जलसंधारण, जलयुक्त शिवार, पाणीपुरवठय़ाच्या योजना याच्या स्वतंत्र नोंदी असल्यामुळे तेलंगणाच्या अर्थसंकल्पात जलसंपदाची तरतूद अधिक आहे, असे दिसते. मात्र, हा गैरसमज आहे असा खुलासा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात जलसंपदा विभागासाठी तरतूद वाढवावी, अशी सूचना आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेत जाहीरपणे केली होती. मराठवाडय़ातील जिल्हा नियोजन समितीसाठी लेखानुदानात किती रक्कम मंजूर करायची, याचा आढावा घेण्यासाठी ते औरंगाबादमध्ये आले होते.

तेलंगणातील अर्थसंकल्पातील तरतूद आणि राज्यातील तरतूद याबाबतची चौकशी केली. मात्र, ते एकत्रित तरतूद दाखवतात. आता वॉटर ग्रीडसाठीची किंवा पाणीपुरवठय़ासाठीच्या योजनांची रक्कम आपल्याकडे स्वतंत्रपणे नोंदविली जाते. तरीही त्यांची काही रक्कम आपल्यापेक्षा अधिक असू शकेल. मात्र, जलसंपदा विभागासाठी तरतूद कमी आहे हा गैरसमजच असल्याचे ते म्हणाले. हा गैरसमज गडकरी यांचा आहे का, असे  विचारल्यानंतरही त्यांनी स्वतंत्र तरतुदी आणि एकत्रित तरतुदी असाच खुलासा केला.

अटल आनंदवन योजना

मराठवाडय़ात भविष्यात वनक्षेत्र वाढावे म्हणून ‘अटल आनंदवन’ ही योजनाही सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका एकरात साधारण साडेतीनशे ते चारशे झाडे लावली जातात. मात्र, या योजनेत १२ ते २० हजारांपर्यंत झाडे लावली जातात. मराठवाडय़ात निजामकालीन शाळांच्या इमारतींसाठी स्वतंत्रपणे निधी देण्यात आला असून वनक्षेत्र वाढविण्यासाठी निधी देण्याबरोबरच सूक्ष्म सिंचनाच्या योजनेमध्ये ८० टक्के अनुदान दिले जाईल, अशी घोषणाही मुनगंटीवार यांनी केली.