जिल्हय़ासह मराठवाडय़ाच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, पाणीटंचाईची समस्याही तीव्र होत चालली आहे. एका बाजूला पाणीटंचाईचा सामना करताना दुसरीकडे उपलब्ध असलेले अशुद्ध पाणी पिण्याची वेळ जनतेवर आली आहे. १७८ ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडर (टीसीएल) उपलब्ध नसल्यामुळे येथील पाण्याचे शुद्धीकरणच होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
एकूण १ हजार ३०९ पैकी १७८ ग्रामपंचायतींमध्ये ब्लिचिंग पावडर उपलब्ध नाही. जि. प. आरोग्य विभागाकडून वारंवार सूचना देऊनही संबंधित ग्रामपंचायतीने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. ब्लिचिंग पावडर खरेदीचे अधिकार ग्रामपंचायतकडेच आहेत. परंतु अनेक ग्रामपंचायतींनी याबाबत निष्काळजीपणा केला. त्यामुळे नाइलाजाने नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
यात सर्वाधिक म्हणजे ३० ग्रामपंचायती किनवट, तर २९ ग्रामपंचायती मुखेड तालुक्यातील आहेत. यापाठोपाठ देगलूर २२, हदगाव २१, नांदेड १८, तसेच नायगाव व हिमायतनगर तालुक्यांत प्रत्येकी १४, धर्माबाद तालुक्यात १० ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडर उपलब्ध नाही. या सर्व ग्रामपंचायतींनी तातडीने ब्लिचिंग पावडर उपलब्ध करावी व नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल, यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य सभापती संजय बेळगे यांनी केले आहे.