यंदा सुरुवातीला वेळेवर आलेल्या पावसाने तब्बल महिनाभरापासून दडी मारल्याने खरीप हंगामातील जवळपास आठ लाख हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. अनेक भागांतील पिकांनी माना टाकल्याने आगामी काही दिवसांत पाऊस पडला नाही तर या वर्षीही शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.  अर्धा पावसाळा संपला तरी अद्याप एकाही प्रकल्पात पाणी वाढले नसून, सर्व लघु व मध्यम प्रकल्पात केवळ तीन टक्केच पाणीसाठा असल्याने पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

बीड जिल्ह्यात सलग तीन वर्षे पावसाअभावी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी तर बहुतांशी प्रकल्प कोरडेठाक पडल्याने आणि खरीप व रब्बीचे दोन्ही हंगाम कोरडे गेल्याने भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. या वर्षी चांगला पाऊस पडेल, अशी अपेक्षा असताना जून महिन्यात सुरुवातीला पाऊस वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. दुष्काळी अनुदान आणि पीकविमा यामुळे हातात पडलेला पसा खर्च करून शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. कमीअधिक प्रमाणात पाऊस पडत राहिल्याने पिकेही जोमात वाढली आहेत. मात्र, मागील एक महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे आता पिकांची परिस्थिती अवघड झाली आहे.

अनेक भागांतील पिके सुकू लागली असून, आगामी काही दिवसांत पाऊस आला नाहीतर पिके वाळून जातील, अशी परिस्थिती आहे. या वर्षी सरासरीच्या तुलनेत ४५ टक्के पाऊस झाला असला तरी नदीनाल्यांना पाणी खळखळले नाही. लघु आणि मध्यम प्रकल्पात केवळ ३.३८ टक्केच पाणी उपयुक्त आहे. परिणामी, अनेक गावांना आजही टँकरद्वारेच पाणीपुरवठा केला जात आहे. खरिपाच्या ७ लाख ९० हजार ३८५ हेक्टरवर पेरा झाला असून, यात कापूस ३ लाख ३२ हजार ८९०, बाजारी ८७ हजार ५१२, सोयाबीन २ लाख १३ हजार ९११, उडीद २९ हजार ७०२, मूग २४ हजार १९८ हेक्टरवर लागवड झाली आहे. सुरुवातीला पाऊस पिकांसाठी पूरक पडल्यामुळे चांगल्या जमिनीवरील पिकेही जोमाने वाढली. पण तब्बल महिनाभरापासून पाऊस गायब झाला आहे. दररोज सकाळपासूनच ऊन पडू लागल्याने व जोराची हवा वाहत असल्याने जमिनीत असलेली ओल कमी होत गेली. परिणामी, मागील आठवडय़ापासून अनेक भागांतील पिके सुकू लागली आहेत. आगामी चारपाच दिवसांत पाऊस पडला नाही तर खरिपाच्या क्षेत्रावरील उगवलेली पिके धोक्यात येणार आहेत.