केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग यांची ग्वाही

पंतप्रधानपदावर जोपर्यंत नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत कृषी उत्पन्नावर कर लागणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी मंगळवारी दिली. औरंगाबाद येथे आयोजित कृषी प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या कृषी क्षेत्रातील विविध निर्णयाची माहिती तासभराहून अधिक वेळ देत आणि काँग्रेसला चिमटे काढत त्यांनी शेती उत्पन्नावर कर लावला जाण्याची आवई ठोकली जात असल्याचे त्यांनी सांगितले. जेवढे दिवस सर्वसामान्य माणसाने नोटबंदीनंतर कळ सोसली तेवढे वर्ष देशाचे पाऊल पुढे पडले आहे, असे समजा असे सांगत राधामोहन सिंग यांनी केंद्रीय योजनाची जंत्री भाषणातून सांगितली.

औरंगाबाद येथे गेल्या तीन दिवसांपासून आयोजित कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात २५० कंपन्यांनी सहभाग नोंदविला. समारोपाच्या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलबिरादरी प्रकल्पाचे राजेंद्रसिंह राणा, बद्रीनारायण बारवाले, उद्योजक राम भोगले, महापौर भगवान घडामोडे, आमदार अतुल सावे, विजयअण्णा बोराडे यांची उपस्थिती होती. नोटबंदीमुळे देशातील काळा पैसा बाहेर निघत असल्याचे सांगत या निर्णयाला विरोध करणाऱ्यांनी अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या. आधी घरातील स्त्रीधन कसे असुरक्षित झाले आहे, अशी अफवा पसवली गेली. त्यावर पंतप्रधानांनी सांगितले, अडीच लाख रुपयापर्यंतची रक्कम करमुक्त असेल. त्यानंतर शेतकऱ्यांचे नाव पुढे करून आवई उठवली गेली. देशात शेती उत्पन्नावर कर लागेल, असे सांगण्यात आले. मात्र, जोपर्यंत पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत शेतीवर कसलाही कर लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, असे राधामोहनसिंग म्हणाले.

शेतीतील सुधारणांसाठी केंद्र सरकार कशी पाऊले उचलत आहे, हे सांगण्यासाठी पंतप्रधान सिंचन योजनेचा उल्लेख केला. या प्रश्नी त्यांनी काँग्रेसलाही टोला लगावला. देशातील ५६ टक्के शेतीला पाणी देता आले नाही. देशाची सत्ता एकाच घरात केंद्रित होती. त्यांच्याच पक्षाचे लोक जेव्हा संसदेमध्ये सांगत होते की, देशातील १०० हून अधिक सिंचन प्रकल्प पैशाविना रखडले आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाले असते तर ७६ लाख हेक्टर शेतीचे सिंचन झाले असते, असे ते सांगत होते. अशा प्रकल्पांना ८० हजार कोटी रुपये दिले आहेत.