सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहनचालकांच्या सुरक्षेबाबत सर्व उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. हेल्मेटची सक्ती नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मुंबई-नागपूरसह पुण्यामध्येही केली जाईल, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी येथे सांगितले. याबाबतचे निर्देश पूर्वीच देण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी औरंगाबाद शहरात पोलीस आयुक्तांनी चांगल्या पद्धतीने केली. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करायला हवे. याबरोबरच येथील शैक्षणिक संस्थांनी या अनुषंगाने घेतलेला पुढाकार वाखाणण्याजोगा असल्याचे रावते यांनी सांगितले.
औरंगाबाद शहरातील अमरप्रीत चौकात हेल्मेट न घालणाऱ्या व्यक्तींना गुलाब फूल देऊन रावते यांनी ‘गांधीगिरी’ केली. २७ व २८ डिसेंबर रोजी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त कृतिशील अभियान म्हणून काही कार्यक्रम हाती घेतले होते. यात चारचाकी गाडीचालकांनी बेल्ट वापरावा, गाडी चालवताना मोबाइलवर बोलू नये, सिग्नल तोडू नये, क्षमतेपेक्षा अधिक ओझे वाहणाऱ्या वाहनांचे तीन महिने परवाने निलंबित करण्याची कारवाई मुंबईत करण्यात आली. आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतो आहोत, असे सांगत हेल्मेटसक्तीबाबत बोलण्याचे त्यांनी टाळले. ‘सक्ती’ हा शब्द न उच्चारता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करीत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यापुढे नव्याने दुचाकी घेणाऱ्यांना हेल्मेट वापरणार, असे प्रतिज्ञापत्रही लिहून घेणार असल्याचे रावते यांनी सांगितले. हेल्मेट वापरणे कधीही चांगले, असेही ते म्हणाले.