बाराशे जणींसमोर जगण्याचा प्रश्न

गेल्या आठ दिवसांत ‘रात्रीच्या विश्वात’ बरेच काही घसरले. प्रत्येक जण मोठी नोट दाखवायचा, पण त्याचा उपयोग काय होता. देहविक्रय करून चरितार्थ भागविणाऱ्या हजार-बाराशे महिलांना नोटबंदीमुळे वेगळय़ा संकटांना सामोरे जावे लागले. ८ नोव्हेंबरच्या दिवशी हजार आणि पाचशेच्या नोटा स्वीकारल्या, पण आता काय करायचे, असा प्रश्न आहे. जगण्याचेच प्रश्न निर्माण झाले आहेत.

उजाडल्यावर कामाला जाणाऱ्यांचे जग वेगळे आणि दिवसा काय घडते, याची माहिती नसणाऱ्यांचे जग वेगळे. देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या आरोग्याबाबत काम करणारे मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे संचालक आप्पासाहेब उगले यांच्या संस्थेशी संबंधित ‘त्या’ तिघी जणी नोटबंदीवर बोलत्या झाल्या. ‘सुरुवातीचे आठ दिवस काही सुचले नाही. दरवेळी प्रश्न सुटय़ांचा यायचा. तो हजाराची नोट दाखवायचा, पण त्याचा उपयोग काय?’ रंजूबाई म्हणाल्या, ‘आमचे काही नाही, पण ज्या केवळ एवढंच काम करतात, त्यांच्या मुला-बाळांची आबाळ सुरू आहे. काही जणींनी मिळेल ते सुट्टे पैसे घ्यायला सुरुवात केली.’

औरंगाबादमध्ये तशा वस्त्या आता शिल्लक नाहीत की जिकडे बोट दाखवता येईल, पण देहविक्री काही थांबलेली नाही. दारिद्रय़ात पिचलेल्या, अन्य कोणताच पर्याय नसलेल्या अनेक जणी औरंगाबादहून जालना, शिर्डी, नगर, जळगाव असा प्रवास करतात. या प्रत्येकीला नोटबंदीची झळ सहन करावी लागते. पूर्वी ‘नट्टय़ापट्टय़ावरून ओळख निर्माण करून दिली जात असे. आता सारे लपूनछपून असते किंवा थेट ऑनलाइन. एड्ससारखा महाभयंकर रोग होऊ नये म्हणून घ्यावयाच्या काळजीबाबत आप्पासाहेब उगलेंसारखे कार्यकर्ते प्रयत्न करत असतात. पण नोटबंदीचा निर्णय असा अचानक झाला की काय करावे, हे कोणालाच समजले नाही. या व्यवसायात जगणाऱ्या अनेक जणींचे बँकेत खाते नाही, आधार कार्ड नाही. त्यामुळे नोटांच्या जगाचा संबंध केवळ रात्रीचा. जगण्याच्या कसरतीत नोटबंदीमुळे नवीन अडचणी अनेक जणींसमोर आ वासून उभ्या आहेत. त्या विश्वात नोटाबंदीचा असर खूपच अधिक आहे.’