औरंगाबाद : काही वर्षांपूर्वी भाजपचा कार्यकर्ता ‘शिस्तप्रिय’ असे. कम्युनिस्टांचे केडर आहे. पक्षाच्या विचारसरणीचा कट्टर समर्थक घडविणाऱ्या या पक्षांच्या यादीत वंचित बहुजन आघाडीचाही समावेश करावा लागेल, अशी रचना हाती घेण्यात आली आहे. पण असा कार्यकर्ता तयार करताना वंचित बहुजनचा केंद्रबिंदू जातसमूह हा आहे. धनगर, भटके विमुक्त या दोन समूहांची प्रशिक्षणे पूर्ण करण्यात आली असून मुस्लीम मौलवींची भेट देखील याचाच भाग असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशिक्षणे घेतली जात आहेत. या प्रशिक्षणांमधून भविष्यात कोणकोणत्या योजनांवर कसे काम उभे करता येऊ शकते, याचा आराखडा देखील तयार केला जात आहे. औरंगाबाद आणि जळगाव या दोन जिल्ह्य़ांमध्ये जळगावचे सोने आणि अजिंठय़ाची लेणी असे दोन घटक अर्थकारणाला पुढे नेणारे आहेत. पण आतापर्यंत त्याचा कधी विचार केला गेला नाही. असा विचार नव्याने मांडणारी कार्यकर्त्यांची फळी वंचित बहुजनकडे आहे. आतापर्यंत जोडलेली बहुतांश माणसे रूढ अर्थाने राजकीय कार्यकर्ते नाहीत. मात्र, त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. वंचित आघाडीमधील समाजाचे प्रश्न वेगवेगळे असतात.  भटक्या विमुक्तांना राहायला जागा हवी असते, तर धनगर समाजातील व्यक्तींना शेळीमेंढी चारण्यासाठी जागा हवी असते.  त्यामुळे प्रत्येक जातसमूहाला स्वतंत्रपणे वंचित बहुजनांचे प्रश्न एकत्रित सांगावे लागतात. जातसमूहाला केंद्रस्थानी ठेऊनच  प्रशिक्षण घेतले जात आहे. माळी समाजाचे प्रशिक्षण लवकरच घेणार आहे. मुस्लीम मौलवींची भेट देखील याचाच भाग असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

काँग्रेसची भाषा कमरेखालची

काँग्रेस आघाडीबरोबर बोलणी सुरू आहे की नाही, या प्रश्नाचे उत्तर देताना काँग्रेसकडून होणाऱ्या कमरेखालच्या टीकेवर प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले. ते म्हणाले, त्यांचे राजकारण रेडलाइट एरियातले असावे अशी भाषा आहे. त्यांना कमरेखालची भाषा वापरता येते. आम्ही अजून काहीही बोललेलो नाही. राजकारणात टीका होत असते, हे मलाही मान्य आहे. पण काँग्रेसकडून ज्या पद्धतीने झाली त्याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी, अशी भूमिका घेत काँग्रेस आघाडीबरोबरची बोलणी पूर्वी वृत्तवाहीन्यांद्वारे होत होती. आताही त्यांच्याबरोबर दूरध्वनीवरूनही बोलणे होत नाही, असे ते म्हणाले.