औरंगाबाद जिल्ह्य़ात शुक्रवारी सकाळी आलेल्या करोनाबाधितांच्या तपासणीच्या अहवालानुसार नव्याने १९३ रुग्णांची वाढ झाली. त्यात १०२ रुग्ण महानगरपालिका क्षेत्रातील आहेत तर ९१ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. औरंगाबाद शहरातील रोशन गेट भागातील एकाचा आज मृत्यू झाला. जिल्ह्य़ात एकूण ४ हजार ४९२ एवढय़ा करोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. यातील २ हजार २९३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १ हजार ९६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २३२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या इंदिरानगर, गारखेडा, घाटी परिसर, जाधववाडीतील संभाजी कॉलनी, एन-११ मधील सुदर्शनगर, बेगमपुरा, चिकलठाणा, उल्कानगरी, पार्वतीनगर-पहाडसिंगपुरा, न्यू हनुमाननगर – गल्ली नं. ५, सौजन्यनगर, एन-२ ठाकरेनगर, आविष्कार कॉलनी, बजाजनगर, बीड बायपास, अजबनगर, एन-१-टाउन सेंटर, एन-७ सिडको, रायगडनगर, म्हाडा कॉलनी, एन-९, न्यू एसटी कॉलनी, न्यू गजानननगर, एन-११ मयूरनगर, सुरेवाडी हर्सूल, लोटा कारंजा, पीरबाजार, संजयनगर आदी मिळून ५७ भागांमध्ये एकूण १०२ रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात द्वारकानगरी बजाजनगर, वाळूजसह गंगापूर, वैजापूर, करमाड आदी भागांमध्ये मिळून ९१ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये १०९ पुरुष तर ८४ महिला रुग्णांचा समावेश आहे.

पाथरा गाव प्रतिबंधित

शहरातील निरनिराळ्या भागातील ४ जण बुधवारी करोना सकारात्मक आढळल्यानंतर गुरुवारी सकाळी परभणी तालुक्यातील पाथरा गावातील एकाचा स्वॅब सकारात्मक आला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ते गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. दरम्यान, करोनाबाधितांची संख्या अचानक वाढल्याने परभणी शहर मनपा हद्दीत उद्या (शनिवारी) मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी केली लागू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ६१३ संशयितांची नोंद झाली आहे. यापैकी २ हजार ८१२ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यातील २ हजार ५८७ नमुने नकारात्मक आले. सकारात्मक रुग्णांची संख्या १०३ वर पोहोचली असून यातील तीन जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे तर ९० जण करोनामुक्त झाले आहेत. नव्याने बाधित १० रुग्णांवर उपचार सुरू असून ते नव्याने बाधित  रुग्ण राहत असलेला पाथरा गावाचा परिसर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या आदेशाने प्रतिबंधित करण्यात आला आहे.

नांदेड, लातूर, हिंगोलीमध्ये मृत्यूची नोंद

* नांदेड : गुरुवारी नांदेडात करोनाचे पाच बाधित सापडल्यानंतर रात्री उशिरा शहरातील पीरबुऱ्हाणनगर भागातील एका महिलेचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ शुR वारी गुलजारबाग या भागातही एका पुरुषाचा मृत्यू झाल्याने करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या १६ वर पोहोचली असून त्यातील २६७ जणांनी करोनाला हरवले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. नांदेड शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गुरुवारी रात्री करोना रुग्णांची संख्या ३३१ वर पोहोचली. ग्रामीण भागात करोनाच्या रुग्णांमध्ये वरचेवर भर पडत चालली आहे. शहरातील विसावानगर व कंधार तालुक्यातील चिखलभोसी व देगलूर शहरात नव्याने रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली. गुरुवारी मध्यरात्री ८ जून रोजी सकारात्मक अहवाल आलेल्या ५५ वर्षीय बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ शुR वारी सकाळी जुन्या नांदेड  परिसरातील गुलजारबाग येथील दोन दिवसांपूर्वी सकारात्मक अहवाल आलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालो. यामुळे करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या आता १६ वर पोहोचली. यातील २६७ जणांनी करोनावर मात करत हरवले आहे. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत ३३१ करोना रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत.

* लातूर : गुरुवारी सायंकाळी आलेल्या अहवालात जिल्हय़ात नव्याने १५ करोनाबाधित आढळले तर उदगीर येथील ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. लातूर शहरात ९, लातूर तालुक्यात १, उदगीर ३ व अहमदपूर २ अशा नव्या करोनाबाधितांची संख्या आहे. शहरातील चार व्यक्ती वाल्मिकीनगर तर माउलीनगर, विठ्ठलनगर, विवेकानंद चौक व एमआयडीसी या भागातील प्रत्येकी एक व्यक्ती करोनाबाधित आहे. उदगीर येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी सायंकाळी ५.१५ वाजता मृत्यू झाला. गुरुवारी सहा व अकरा महिन्यांच्या बाळासह उदगीरमधील चौघे करोनामुक्त झाले तर लातूर येथील सात जण करोनावर उपचार घेऊन घरी परतले. जिल्हय़ात आतापर्यंत एकूण करोनाबाधित २६६ असून १८६ जण उपचार घेऊन घरी परतले. १४ जणांचा मृत्यू झाला तर ६५ जण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

* हिंगोली : जिल्ह्य़ाच्या सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द येथील २१ वर्षीय करोनाबाधित तरुणीचा बुधवारी अकोला येथील आयकॉन रुग्णालयात मृत्यू झाला. तत्पूर्वी तिच्यावर वाशीम येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या संपर्कातील सर्वाना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. जिल्ह्य़ात आतापर्यंत २५१ करोनाबाधित रुग्ण होते. यापैकी २२९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले. सद्यस्थितीत २२ रुग्ण भरती आहेत. आतापर्यंत जिल्ह्य़ात एकही करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. परंतु यापूर्वी वसमतच्या करोनाबाधित रुग्णावर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. जिल्ह्य़ात विविध ठिकाणच्या विलगीकरण कक्षात ४ हजार २३३ व्यक्तींना भरती करण्यात आले होते. ३ हजार ५५४ व्यक्तींना घरी सोडण्यात आले.