मृतांचा आकडा नऊवर; प्रतिबंधित क्षेत्र वाढणार

करोनाचा शहरातील प्रसार प्रत्येक दिवशी वाढत असून शनिवारी बाधितांची संख्या २४४ वर पोहोचली. महाराष्ट्र दिनी गारखेडा परिसरातील गुरुदत्तनगर येथील ४७ वर्षीय वाहनचालाकाचा मृत्यू झाला. याशिवाय आज मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचा शनिवारी सकाळी आठच्या सुमारास मृत्यू झाला. यामुळे शहरातील करोना बळींची संख्या नऊ झाली आहे.

दरम्यान शहरातील मुकुंदवाडी भागातील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. महापालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूंनी लाळेचे नमुने घेण्याचे प्रमाण वाढविले आहे. ज्या भागात पूर्वी रुग्ण सापडले होते, त्या भागात तसेच काही नवीन भागात करोनाबाधित रुग्ण सापडत असल्याने करोना विषाणूचा फैलाव नक्की किती झाला आहे, याचा अंदाज घेऊन प्रतिबंधित क्षेत्राची केंद्र आणखी वाढवली जात आहेत. मात्र, त्यात रोज बदल होत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

शनिवारी सकाळच्या सत्रातील चाचणी अहवालात नूर कॉलनी येथे पाच, बाजयीपुरा भागात ११, कैलाश नगरमध्ये तीन, समतानगरमध्ये व जयभीम नगरमध्ये प्रत्येकी दोघांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच किलेअर्क भागातही पुन्हा एकास लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान शहरातील आठ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मुकुंदवाडी परिसरातील संजयनगर भागात असणाऱ्या एका महिलेच्या संपर्कात आल्याने हे नवीन उद्रेकस्थळ बनले. या भागात एकाच वाडय़ातील बहुतेक जण बाधित आहेत.  त्यामुळे या भागातून नागरिकांनी बाहेर जाऊ नये आणि या प्रतिबंधात्मक क्षेत्रात बाहेरुन आतमध्ये जाता येणार नाही, यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

याभागातील नागरिकांनीही स्वत:हून रस्ते बंद केले आहेत.

भ्रमणध्वनीद्वारे हालचालींवर लक्ष

करोनाबाधितांकडून कोण कोणाच्या संपर्कात आले होते,याची माहिती काढून घेणे हे काम जिकिरीचे बनत असल्याने आता सर्व बाधित  रुग्णांच्या हालचाली भ्रमणध्वनी मनोऱ्याच्या माध्यमातून मिळविल्या जात आहेत. विषाणूचा सुप्त अवस्थेतील कालावधी १४ दिवसाचा असल्याने तो व्यक्ती नक्की कोठे फिरला याची माहिती प्रत्येकाच्या लक्षात राहणे शक्य नसते. काही भागातून माहिती देण्यास विरोधही होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात येत होते. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्यावरुन कोण कोणाच्या संपर्कात होते, याची यादी केली जात असून त्या आधारे लाळेचे नमुने घेतले जात आहेत.  जास्तीत जास्त चाचण्या करुन बाधितांना शोधणे आणि त्यांच्यावर उपचार केला तरच हा आजार नियंत्रणात आणता येऊ शकतो. त्यामुळे ही पद्धत अवलंबली जात असल्याचे विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

महिलेचा मृत्यू

करोनाची बाधा झालेल्या व मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचा शनिवारी सकाळी आठच्या सुमारास मृत्यू झाला. सकाळी या महिलेस रुग्णालयात गंभीर स्थितीमध्ये भरती करण्यात आले होते. मृत्यूपश्चात घेण्यात आलेल्या लाळेचा नमुना कोवीड-१९ चाचणीला सकारात्मक आल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे. औरंगाबाद शहरातील हा नववा करोनाबळी आहे.

विषम दिवशी पूर्ण बंद

रुग्णसंख्या वाढत असल्याने टाळेबंदी अधिक कडक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ३ मे पासून ते १७ मे या कालावधीमध्ये विषम तारखेस शहर पूर्ण बंद राहणार असून सम तारखांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी ११ पर्यंतच मुभा देण्यात आली आहे. यामध्ये औषधी दुकाने तेवढी वगळण्यात आली आहेत. या कालावधीशिवाय कोणी फिरताना आढळल्यास गाडी जप्त करुन गुन्हे दाखल केले जातील. तसेच ड्रोनच्या माध्यमातूनही पाहणी केली जाणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी कळविले आहे.