टाळेबंदीत ५० हजार ‘अँटिजेन’ चाचण्या होणार

औरंगाबाद: शहरात लागू करण्यात आलेल्या दहा दिवसाच्या टाळेबंदीच्या काळात ५० हजार ‘अँटिजेन’ चाचण्या करण्याचे ठरविण्यात आले असून त्यासाठी लागणारे साहित्य शनिवारी मुंबईहून निघाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकरी नीता पाडाळकर यांनी सांगितली. दरम्यान शहरात शनिवारी रुग्णसंख्येचा आकडा १९४  ने वाढला. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा आठ हजारापेक्षा अधिक झाला. उपचारादरम्यान ३४७ जणांचा मृत्यू झाला आहे.

अ‍ॅन्टीजेन चाचणीमध्येही विषाणू शरीरामध्ये आहेत का, याची तपासणी ‘आरएनए’च्या माध्यमातून केली जाते. शहरातील विविध रस्त्यावर येणाऱ्या वाहनातील व्यक्तींची तपासणी करण्याच्या प्रक्रियेमुळे शहरात विषाणूसह येणाऱ्या व्यक्तीवर उपचार करता येणे शक्य होणार आहे. टाळेबंदीमध्ये जास्तीतजास्त करोना चाचण्या झाल्या तर रुग्णांवर उपचार होतील,असा प्रशासनाचा दावा आहे. शहराच्या सहा बाजूने येणाऱ्या वाहनांतील प्रत्येकाची चाचणी केली जात आहे. दरम्यान या चाचणीसाठी लागणारे साहित्य मुंबईहून मागविण्यात आले आहे.  दरम्यान टाळेबंदीचा दुसरा दिवसही कडक अंमलबजावणीचा होता.  टाळेबंदीच्या दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर कोणी नाहक फिरणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेतली जात होती. शहरातील विविध भागात आणि छोटय़ा गल्लयांमध्येही पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सुटी असल्यानेही शनिवारी बहुतेकांनी टाळेबंदीचे पालन केले. ज्यांनी त्याचे उल्लंघन केले अशा व्यक्तींना दंड आकारणे तसेच  तरुणांना उठाबशा काढायला लावणे अशा प्रकारची कारवाई केली.

दरम्यान लाळेचे नमुने घेण्याचाही वेग वाढविण्यात आला आहे. एका बाजूला टाळेबंदी आणि दुसऱ्या बाजूला चाचण्यांचा वेग वाढविण्यात येत आहे. ज्या भागात रुग्णसंख्या अधिक होती त्या  भागात अधिक चाचण्या घेतल्या जात आहेत. ‘अ‍ॅन्टीजेन’ चाचण्यांमुळे विषाणू प्रादुर्भाव झाला आहे की नाही हे लवकर समजते. त्यामुळे याचा अधिक फायदा होत असल्याचा महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा आहे. दरम्यान शहरातील सहा भागामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५९३ जणांचे नमुने घेण्यात आले होते, त्यापैकी २२ जणांना बाधा झाल्याचे पुढे आले आहे. दरम्यान कांचनवाडी भागात २३, नगरनाका भागात दोन, चिकलठाणा भागात दोन  रुग्णांचे अहवाल आरटी-पीसीआर चाचणीने घेण्यात आले.

पाच जणांचा मृत्यू

शहरातील हडको भागात राहणाऱ्या दीपनगरमधील ८० वर्षीय व्यक्ती आणि बायजीपुरा भागातील ४० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला करोना व्यतिरिक्त अन्य कोणताही आजार नव्हता. त्याचबरोबर वाळूज या औद्योगिक वसाहतीमधील श्रद्धानगर भागातील ५० वर्षीय पुरुष, लोटाकारंजा व क्रांती चौक भागातील व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या पाच पैकी तीन  व्यक्तींना कोणतेही अन्य आजार नव्हते, तर एकास उच्च रक्तदाब आणि मधुमेह असे आजार होते.

जालन्यात करोनाचे ९५२ रुग्ण

जालना : जिल्ह्य़ात शनिवारी ४४ नवीन रुग्ण आढळून आल्याने एकूण करोनाबाधितांची संख्या ९५२ झाली आहे. नवीन रुग्णांमधील ४२ जालना शहरातील आहेत. ५६३ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्य़ात आतापर्यंत ३७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी करोनाच्या वाढत्या संख्येबाबत माहिती घेतली. शासकीय रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या निदान प्रयोगशाळेची पाहणी केली. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रयोगशाळेचे ऑनलाईन उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड उपस्थित होते.

३०७ वाहनधारकांवर कारवाई

औरंगाबाद शहरातील संचारबंदी दरम्यान शनिवारी दुसऱ्या दिवशी एकूण ३०७ वाहनधारकांवर  कारवाई करण्यात आली. त्यात एकूण ७५ हजार शंभर  रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मराठवाडय़ातील करोना रुग्णांची स्थिती

जिल्ह्याचे नाव         बाधितांची एकूण संख्या     बरे झालेले रुग्ण       मृत्यू     

औरंगाबाद                            ८१४३                           ४४६३                      ३४७

नांदेड                                      ५६४                           ३५८                       २५

परभणी                                  १९९                            १११                      ०५

लातूर                                     ६३४                            ३२५                       ३२

जालना                                  ९१२                             ५६३                        ३७

बीड                                        २१०                            १२०                        ०४

हिंगोली                                 ३२८                              २७२                        ००

उस्मानाबाद                          ३४६                              २१६                         १४