करोना मृत्यू भय वाढतेच असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नऊ जणांचा मृत्यू झाला. शहरातील शहागंज, आंबेडकरनगर, मुकुंदवाडी भागातील प्रत्येकी एक तर गंगापूर, वैजापूर तालुक्यातील करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण करोनाबळींची संख्या ६१५ झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यतील ग्रामीण भागातून येणारे रुग्ण गंभीर स्थितीमध्ये येत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. लवकर निदान झाल्यास उपचार करणे शक्य होत असल्याने ग्रामीण भागात आजारपण अंगावर काढू नका, असा सल्ला दिला जात आहे. गंगापूर तालुक्यात करोनाबाधितांची संख्या अधिक असून मृत्यूही वाढत आहेत. आता पैठणमध्येही संसर्ग वाढला असल्याचे निरीक्षण सरकारी अधिकाऱ्यांमध्ये आहे.

मोहरम आणि गणेशोत्सव हे सण तोंडावर असल्याने गर्दी होणार नाही याची काळजी घेत व्यवहार पार पाडावेत,  असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. गुरुवारी शांतता समितीची बैठकही घेण्यात आली. यामध्ये करोना संसर्ग वाढणार नाही यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. बुधवारपासून प्रतिजन चाचणी संच प्राप्त झाल्यानंतर चाचण्यांना पुन्हा वेग देण्यात आला. मात्र, लक्षणे असणाऱ्या आणि संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या घेण्याचे नियम पाळले जात आहेत.