परस्परविरोधी तक्रारीनंतर कदीर मौलाना यांना जामीन

एमआयएम-राष्ट्रवादीचे कार्यकत्रे सोमवारी मतदान प्रक्रिया सुरू असताना समोरासमोर भिडले. या भांडणाचे रूपांतर सायंकाळी कटकट गेट भागात हाणामारीमध्ये झाले. त्यातूनच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली होती. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी एमआयएमच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुद्ध शस्त्रबंदी आणि जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया सुरू असताना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मंजूरपुरा भागात एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकत्रे समोरासमोर आले. एमआयएमचा कार्यकर्ता अब्दुल कासीफ खान (रा. मोमीनपुरा) याने सिटी चौक पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंजूरपुरा येथील बूथ क्र. १७८ आणि १७९ पासून शंभर मीटरबाहेर एमआयएमच्या पोलचीटचे काम करतेवेळी कार्यकर्ता मुजफ्फर खान याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एमआयएमचे काम का करतो, असे म्हणत धमकावले. या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना यांचा मुलगा ओसामा, कार्यकत्रे सय्यद फैय्याज, मुजफ्फर अतिक, सलीम, मुजाहीत मॉन्टी आणि जाहीद यांनी टेबलला लाथ मारली. तसेच या ठिकाणी तुम्ही काम करू नका असे म्हणत ओसामाने अब्दुल खानला बाजूला नेले. याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. या दरम्यान राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी ‘एमआयएमच्या कार्यकर्त्यांना मारा, त्यांना सोडू नका’ असे म्हणताच सलीम याने लोखंडी रॉडने अब्दुल खानच्या बरगडीवर मारा केला. हा प्रकार पाहून मुजफ्फर खानने भांडण सोडविले. या प्रकारानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कटकट गेट भागात इमरान अब्दुल अजीज कादरी याला एमआयएमचे काम का करतो म्हणत उमेदवार कदीर मौलाना, माजी विरोधी पक्षनेता अज्जू पहेलवान, सय्यद अख्तर, ओसामा व मौलानाचा भाऊ यांच्यासह दहा ते बारा जणांनी शिवीगाळ व मारहाणीला सुरुवात केली. या मारहाणीत इमरान कादरीसोबत आदील नाजेर पठाण हा जखमी झाला.

हे भांडण सुरू असताना जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दोन्ही गटाला बाजूला केले. त्यानंतर सगळे सुरळीत सुरू असताना नेमके खासदार इम्तियाज जलील तेथे आले. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. खासदार जलील यांनाही धक्काबुक्की झाली होती. दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर कदीर मौलाना व अन्य दोघांना अटक करण्यात आली. मौलाना यांना मंगळवारी जामीन मिळाला.