औरंगाबादमधील शेतकऱ्यांचा प्रयोग यशस्वी

औरंगाबाद : चवदार भेंडीच्या भाजीचे हिरव्या रंगातील विविध प्रकार बाजारात पाहायला मिळत असले, तरी औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक तांबडी भेंडी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. ही तांबडी भेंडी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी असल्याचा दावा विक्रेत्यांकडून केला जात असून त्याची लागवड मोठ्या प्रमाणात पाचोड परिसरात करण्यात आली आहे.

पाचोड येथील शेतकरी प्रकाश गायकवाड यांच्यासह परिसरातील काही शेतकऱ्यांनी तांबड्या भेंडीची लागवड केली. एक एकरमध्ये चार बाय एक-दोन फूट, अशा अंतरावर या भेंडीची लागवड करण्यात आली. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही भेंडी असल्याचा दावा गायकवाड यांनी केला.  तांबड्या भेंडीचे वाण हे वाराणसी भाजी अनुसंधान केंद्राकडून विकसित करण्यात आले आहे.

थोडी माहिती…

या भेंडीचा सरासरी दीड महिन्यानंतर पहिला तोडा होतो. पाच ते सहा तोडे केले जातात. सुरुवातीला औरंगाबादच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजारपेठेत ३१ ते ३२ रुपये किलोचा बाजारभाव मिळाला. त्यानंतर मात्र, भाव घसरणीला लागले. कारण लाल रंगांची भेंडी सुरुवातीला ग्राहकांना चकित करत होती. त्यामुळे सुरुवातीला विक्रीत अडचण आल्याचे उत्पादकांनी सांगितले. मात्र विक्री व्यवस्थापन साधले तर शेतकऱ्यांना फायदेशीरही ठरू शकते.

फायदे काय?

नवे काय? या भेंडीत अ, ब, क जीवनसत्त्व साधारण ३० टक्के प्रमाणात असल्याचे सांगितले जाते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही भेंडी असल्याचा दावाही केला जात आहे. तांबड्या भेंडीला गोव्यातून अधिक मागणी असल्याचे जाधववाडी कृषी उच्चतम बाजार समितीतील भेंडी विक्री व्यवसायातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

गर्भवतींना भेंडीची भाजी अतिशय उपयुक्त ठरते. कर्करोगास नियंत्रण करणारे घटक या भेंडीत असतात. पचण्यास हलकी. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपकारक.