लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांच्या काळात ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ या जाहिरातीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. याच लोकप्रिय जाहिरातबाजीचा धागा पकडत माजी उप-मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली. शेतकरी मोडला तर राज्य आणि बाजार दोन्ही उद्ध्वस्त होतील. असे झाल्यास राज्याचे आर्थिक कंबरडे मोडून पडेल. राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याचा घाट हे सरकार घालत आहे. त्यामुळे ‘कुठे घेवून चाललाय महाराष्ट्र माझा?’ असं म्हणण्याची वेळ आली असल्याचं पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेचा आज दुसरा दिवस होता आणि भूम येथील जाहीर सभेमध्ये अजित पवार बोलत होते.

आम्ही शेतकऱ्यांना ७१ हजार कोटीची कर्जमाफी दिली परंतु या सरकारने अजुनपर्यंत कर्जमाफी दिलेली नाही. त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते. या सरकारच्या कालावधी पहिल्यांदा शेतकरी संपावर गेला. या सरकारचे प्रतिनिधी कर्जमाफी करण्यासंदर्भात पवार साहेबांचा (शरद पवारांचा) सल्ला घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पवार साहेबांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा असे सांगितले होते. मात्र त्यांनी आपल्या निर्णयामध्ये बदल केले आणि त्यानंतर कर्जमाफीची काय अवस्था आहे हे तुम्ही पाहतच आहात असे पवार यावेळी म्हणाले. कर्जमाफीच्या गोंधळावरून भाजप सरकारवर टिका करताना पवार यांनी, सगळाच शेतकरी माझा मग प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव कशासाठी परंतु हे सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव करताना दिसत आहे असा आरोप केला. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणा मी तुम्हाला वचन देतो राज्यातील माझ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप  देईन नाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही असही यावेळी अजित पवार म्हणाले.

भाजप-सेना हे महाठग

सरकारने ऑनलाईन कर्जमाफी जाहीर केली मात्र ऑनलाईन घोटाळ्यामुळे एकीकडे एकाही शेतकऱ्याला अद्याप रुपयाही मिळालेला नाही. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ऑनलाईनचे बोगस काम करणाऱ्या इनोवेव्ह कंपनीला १०० कोटी रुपये दिल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये केला. सरकारने जाहिरातीवरही ३०० कोटींची उधळपट्टी केल्याचा आरोप करताना भाजप-सेना हे दोन जनतेला भासवणारे महाठग असल्याचा टोला मुंडेंनी लगावला.