औरंगाबाद शहरात सध्या ‘प्रभारी राज’ सुरू आहे. अशात ज्यांच्याकडे शहराची कचराकोंडी सोडवण्याची जबाबदारी होती त्या महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली झाली आहे. त्यामुळे शहर वाऱ्यावर सोडलंय का ? असा प्रश्न विचारला जात आहे. आता पुन्हा नवीन अधिकारी येणार आणि ते कचराकोंडीचा पुन्हा अभ्यास करणार म्हणजे यात वेळेचा अपव्यय आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असेच चित्र दिसून येत आहे. दरम्यान, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांची औरंगाबादच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची मोठी चर्चा सुरू आहे.

नूतन जिल्हाधिकारी म्हणून सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण हे ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून बदलून येत आहेत. शहरात झालेली कचराकोंडी सोडवण्यासाठी नवलकिशोर राम यांच्याकडे महानगरपालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कचराप्रश्नावरून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. तर मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर प्रभारी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. मात्र प्रश्न सुटलेला नसताना पुन्हा बदलीचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेला पुन्हा एकदा आयुक्तांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

शहरात कचऱ्याचे डोंगर अजून तसेच आहेत. ठिकठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. सुरवातीला मुगळीकर यांनी त्यावर तोडगा काढण्याचं काम केलं. त्याची बदली झाल्यानं नवलकिशोर राम काम पहात होते. मात्र अर्ध्यावर प्रश्न असताना शहराला वाऱ्यावर टाकून बदली करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेला नवीन आयुक्त कधी येणार. तो पर्यंत कोण काम पाहणार हे निश्चित झालेलं नाही. तसेच नवीन जिल्हाधिकारी पदावर कधी रुजू होणार हे कळू शकलेलं नाही.