मित्राच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीवरुन परतणाऱ्या चार तरुणांना कंटेनरने धडक दिली असून यात एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तीन जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनरचालक पसार झाला असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला आहे. बीड बायपासवर हा अपघात झाला आहे.
जुनाबाजार येथे राहणारा सोहेल खान (वय २०) हा त्याचे मित्र शेख हमजा शेख हमीद (वय १९), शेख वाहिम शेख लकीब (वय १९) आणि शेख अमेर शेख बाबू (वय १९) यांच्यासह बीड बायपास येथे मित्राच्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेला होता. तिथून परतत असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास चौघेही बीड बायपासवरील पटेल लॉन्स जवळील मिनाज हॉटेलसमोर लघुशंकेसाठी थांबले. यादरम्यान, बीडच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने त्यांना धडक दिली. अपघातानंतर चालकाने कंटेनरसह घटनास्थळावरुन पळ काढला. अपघातानंतर मोठा आवाज आल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता चारही तरुण रक्तबंबाळ अवस्थेत दिसले. स्थानिकांनी त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेले. यातील सोहेलचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर अन्य तिघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. तिघांवर अतिदक्षता विभागात अपघात सुरु आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक सागर कोते करीत आहेत.
एकाच दुचाकीवर चौघे प्रवास करत होते ?
वाहिम, हमजा, आमीर व सोहेल हे चौघे एकाच दुचाकीवर होते, असा अंदाज स्थानिकांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.
बीड बायपास ठरतोय मृत्यूचा मार्ग
बीड बायपासवर वाढत्या अपघाताची संख्या पाहता तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक बंद केली होती. त्यानंतर आलेले तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी या रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी जड वाहनांना वेगमर्यादा ठरवून दिली होती. त्यासाठी स्पीडगनचा वापरही करण्यात आला. पोलीस उपायुक्त डॉ दीपाली धाटे- घाटगे यांनी या परिसरातील नागरिकांच्या सूचना मागविल्या होत्या. मात्र, या मार्गावरील अपघातांचे सत्र थांबू शकलेले नाही. महिनाभरापूर्वीच एका भरधाव ट्रकने वाजंत्रीच्या पथकाला धडक दिली होती. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 18, 2019 2:49 pm