घाटी रुग्णालयात समाजसेवेचा एक उपक्रम

औरंगाबाद : सरकारी रुग्णालयात शुद्ध पाणी देणारे कूलर सुरूच असतील याबाबत बऱ्याच वेळा साशंकताच व्यक्त केली जाते. सध्या ४४-४५ अंशांवर गेलेल्या तापमानाने घशाला कोरड पडल्यानंतर शुद्ध आणि थंड पाणी कोठून आणणार?, असा प्रश्न रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या चेहऱ्यावर दिसला नाहीतरच नवल! अशा वेळी तुमच्यासमोर दोन रुपयांचे नाणे टाका आणि एक लिटरभर शुद्ध पाणी घेऊन जा..एखादा अगदीच गरीब असेल तर तो मोफतही तेवढेच पाणी घेऊन जाऊ शकेल, असा पर्याय समोर दिसला तर तेथे गर्दी नक्कीच दिसेल. अशी गर्दी सध्या औरंगाबादच्या शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात (घाटी) पाहायला मिळत आहे. केवळ रुग्ण आणि समाजसेवेचा दृष्टिकोन ठेवून सुरू केलेले अशा प्रकारचे पाण्याचे एटीएम बहुदा राज्यातील पहिलेच असण्याची शक्यता आहे.

घाटीच्या अपघात विभागाच्या समोरच तुम्हाला एक छोटा नवाच टेम्पो दिसेल. प्रथम दर्शनी एखाद्या मालाची ने-आण करणारा टेम्पो हा प्रत्यक्षात दोन रुपयांत पाणी देणारे एटीएम आहे. कोणीही दोन रुपयांचे नाणे टाकून लिटरभर पाणी बाटलीत घेऊन जाऊ शकतो. पाणी वाटप करणारा शेख सय्यद सांगतो, रशीदपुरा भागातील शेख इत्तेफाक यांनी सामाजिक सेवा करण्याच्या अंगातून पाण्याचे एटीएम सुरू केले आहे. दिवसभरातील दुपारचा जेवणाचा काही वेळ सोडला तर सकाळपासून ते रात्रीपर्यंत एटीएमद्वारे दोन रुपयांत पाणी देणारी सेवा सुरू असते. लिटरभरच नव्हे तर कोणी कितीही पाणी घेऊन जाऊ शकतो.

एटीएम वॉटरचे मालक शेख इत्तेफाक यांनी सांगितले, की पाण्याचा व्यवसाय करताना गरजूंना एटीएमद्वारे पाणी द्यावे, असा विचार सुचला. त्यातून नेमके नाणे टाकले तर पाणी आतून यावे, अशी यंत्रणा तयार केली गेली. छोटा टेम्पो व त्यात दोन रुपयांचे नाणे टाकल्यानंतर पाणी देणारे यंत्र, यासाठी सुमारे ६ लाख खर्च आला. एक सामाजिक उपक्रम म्हणून पाण्याचे एटीएम सुरू केले.

सामाजिक भावनेतून उपक्रम

उन्हाळ्याच्या दिवसात घाटीत येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना पाण्यासाठी दहा ते पंधरा रुपये खर्च करावा लागतो. त्यासाठी अशा गरजूंना अत्यंत माफक दरात शुद्ध पाणी देण्याची कल्पना सुचली. त्यातून दोन रुपयात पाणी देणाऱ्या यंत्रणेचा विचार झाला आणि तो प्रत्यक्षात उतरला. सामाजिकसेवेच्या भावनेने आम्ही हा उपक्रम सुरू केला.

– शेख इत्तेफाक.