दुष्काळातही मराठवाडय़ातील अबकारी करातून मिळणारे उत्पन्न उद्दिष्टापेक्षा अधिक असल्याची आकडेवारी आहे. अबकारी करातून ८१५ कोटी मिळावेत, असे अपेक्षित होते. या वर्षी मराठवाडा व नगर जिल्ह्यातून ८९० कोटी ६२ लाख रुपये मिळाले आहेत. या वर्षी व्हिडिओकॉन डीटूएचमधून सेवाकरही वाढला आहे. सेवाकराचा आकडा ६६४ कोटी २१ लाख रुपयांचा आहे, तर सीमाशुल्कातून ३९१ कोटी रुपये मिळाले आहेत. निर्यातीच्या क्षेत्रात अपेक्षित उत्पन्नापेक्षा ८ कोटी कमी मिळाले आहेत. मराठवाडय़ातून तब्बल १ हजार ९४६ कोटी रुपयांचे उत्पन्न केंद्राच्या तिजोरीत जमा झाले आहे.
अबकारी कर देणाऱ्या प्रमुख उद्योगांमध्ये स्कोडा उद्योगसमूहाचा मोठा वाटा आहे. तुलनेने या संस्थेकडून मिळणारा कर कमी होईल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात ३०० कोटींपेक्षा अधिक रक्कम या एकटय़ा उद्योगसमूहाची आहे. गेल्या काही वर्षांत औरंगाबाद येथील ऑटो क्षेत्रातील उद्योगांमध्ये वाढ झाली नसली, तरी प्रमुख उद्योगांकडून मिळणारा कर दिवसेंदिवस वाढतो आहे.
विकासासाठी मिळणाऱ्या या रकमेत या वर्षी व्हिडिओकॉन डीटूएचमधून मिळणाऱ्या सेवा कराची भर पडली. या समूहाने राज्यातील सेवा कर भरण्यासाठी औरंगाबादच्या अबकारी कार्यालयाची निवड केली. परिणामी सेवा कराचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत झाली. या करातून ६५५ कोटी रुपये मिळावेत असे अपेक्षित होते. तुलनेने दरवर्षी सेवाकराच्या उद्दिष्टात औरंगाबाद काहीसे मागे असल्याचे चित्र असे. या वर्षी मात्र त्यात घसघशीत वाढ झाली आहे.
सीमाशुल्कातून मिळणारे उत्पन्न मात्र काहीसे घटले आहे. औरंगाबादमध्ये दुचाकी बनविणाऱ्या बजाजचा अबकारी कर मुंबई कार्यालयात भरला जातो. त्यामुळे मराठवाडय़ातून भरला जाणारा कर वाढत असल्याचे चित्र आहे. औरंगाबादवगळता अन्य जिल्ह्यातून मात्र फारसा कर मिळत नसला तरी औरंगाबाद शहरातील उद्योगांमुळे कराची रक्कम वाढत आहे.