दुष्काळात तीव्र पाणीटंचाईचा फेरा मागे लागलेल्या लातूरकरांना आतापर्यंत १५ दिवसांतून एकदा नळावाटे कसेबसे पाणी मिळत होते, मात्र शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणात जेमतेम एक दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असल्यामुळे यापुढे फेब्रुवारीत नळाद्वारे एकदाच पाणी देता येऊ शकते. अर्थात, हे पाणी नळाद्वारे दिल्यास ५० टक्के वाया जाते, त्याऐवजी पाणी टँकरद्वारे देण्याचा पर्याय प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे कदाचित फेब्रुवारीपासून लातूरकरांना पाणी पुरवण्यायोग्य पाऊस पडेपर्यंत टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.
लातूर शहराच्या पाणीप्रश्नी सरकार गंभीर असून प्रसंगी रेल्वेने पाणी देऊ, मात्र लातूरकरांना तहानलेले ठेवणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सप्टेंबर महिन्यात जाहीर केले होते. उजनी धरणातून रेल्वेने पाणी पुरवण्याचा  विचार सुरू असताना सोलापुरातील काँग्रेसच्या नेत्यांनी प्रसंगी रक्ताचे पाट वाहतील; पण पाणी देणार नाही असा इशारा दिला. त्यानंतर उस्मानाबाद शहराला उजनी धरणातून मिळणारे अतिरिक्त पाणी लातूर शहराला उपलब्ध करण्यावर विचार झाला. त्यासाठी आयुक्त दरबारी फाइलच्या चकरा झाल्या. उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह यांनी आधी उस्मानाबादला प्राधान्य, नंतर लातूरचा विचार, असे म्हटल्यामुळे पुन्हा अन्य पर्यायाचा शोध सुरू झाला. निम्नतेरणा प्रकल्पातून ८ एमएलडी पाणी लातूर शहराला देता येईल हा पर्याय समोर आला. त्यालाही उस्मानाबादेतील मंडळींच्या विरोधामुळे अडथळा निर्माण झाला. आता दिल्या जाणाऱ्या पाण्यात ४ एमएलडीची घट करून नवीन प्रस्ताव दाखल होत आहे.
लातूरच्या महापौरांसह काँग्रेस नगरसेवकांनी चार दिवस नागपूर विधानभवनासमोर धरणे धरले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पाणीप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, त्या दृष्टीने ठोस पावले उचलली जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी धरणाचे पाणी जलवाहिनीतून लातूर शहराजवळ आणून तेथून टँकरद्वारे पहिल्या टप्प्यात ३५ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक टँकर पाठवून देण्याचा प्रयत्न आहे. टँकर व पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पाणीपुरवठय़ात वाढ केली जाईल. मात्र, नळाद्वारे पाणी देता येईल इतका पाऊस पडल्याशिवाय लातूरच्या नळाला पाणी येणार नाही. त्यामुळे नळधारकांना तोपर्यंत आपल्या नळाला हार घालून ठेवण्याशिवाय पर्याय नाही.
लातूरचे महापौर अख्तर शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाणीप्रश्नाची तीव्रता आपण पोहोचवली आहे. जानेवारीअखेपर्यंत त्यांनी ठोस पावले न उचलल्यास मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला. आमदार अमित देशमुख यांनी लातूरच्या पाणीप्रश्नी ८ महिन्यांपासून अधिकाऱ्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत विविध स्तरांवर पाठपुरावा करीत आहोत. मात्र, सरकारने आतापर्यंत केवळ चालढकल चालवली असल्याचे दिसते. लातूरचे खासदार व जिल्हय़ातील आमदारांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांना भेटून पाणीप्रश्नाचे गांभीर्य पुन्हा लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, एवढे करूनही सरकारने ठोस काही न केल्यास तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. त्यासाठी वर्षां बंगल्यासमोर अथवा मंत्रालयासमोर आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे स्पष्ट केले.