सरकारी काम आणखी जरा थांब हा अनुभव अनेकांना अनुभवायला मिळतो. औरंगाबादमधील एक आजीबाईं गेल्या दीडवर्षापासून हा अनुभव घेत आहेत. दप्तर दिरंगाईमुळे त्यांना हैराण करुन सोडले आहे. औरंगाबादमधील क्रांती चौकात राहणाऱ्या लिलाबाई बालचंद पैठणपगारे दीड वर्षापासून पालिकेत अतिक्रमणधारकांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, पालिका प्रशासन आजीबाईंच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहे. यासंदर्भात आजीबाईंनी आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवारी त्या पालिकेमध्ये ठाण मांडून बसल्या आहेत. त्यांच्या या पवित्र्यानंतर प्रशासकिय कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.

लिलाबाई बालचंद पैठणपगारे आणि मोहिनी दीपक कोटूरवार यांच फकिरवाडी परिसरात घर आहे. आपल्या घरासमोर बाळासाहेब दादापाटील वाघ यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार २३ फेब्रुवारी २०१६ ला पालिकेकडे केली होती. अतिक्रमणामुळे आपला रहदारीचा रस्ता बंद झाल्याचं त्यांनी तक्रारीमध्ये म्हटले होते. त्यानी वारंवार तक्रारीचा पाठपुरावा केला. मात्र दप्तरदिरंगाई कारभारामुळे कारवाई होत नव्हती.

सततच्या पाठपुराव्यामुळे २१ मार्च रोजी अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करण्यासाठी गेलं. मात्र घटनास्थळावर अतिक्रमणधारकांनी राडा केल्यामुळे गेल्या पावली त्याना परतावं लागलं. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना पुन्हा तारीख वाढवून देण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या आजींनी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडली. कारवाई करा अन्यथा मी आत्महत्या करेल, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. त्यानंतर पालिकेचे नवनियुक्त आयुक्त मुगळीकर यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. आयुक्तांनी आदेश दिल्यानंतरही आजीबाई त्यांच्या भूमिकेवर ठाम होत्या. पोलीस बंदोबस्त सोबत नेऊन कारवाई करा, त्यानंतर मी उठेल असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. कारवाई झाली नाही, तर मी घरी जाणार नाही. तसेच साहेबांनाही घरी जाऊ देणार नसल्याचं आजी म्हणाल्या. सकाळी ११ वाजल्यापासून त्या पालिकेत ठाण मांडून बसल्या आहेत.