19 October 2019

News Flash

वैजापुरात पुन्हा कांदा रस्त्यावर

कांदा उत्पादकांना सरकाने दिलासा देत क्विंटलमागे २०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही.

वैजापूर येथील बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला अवघा ५५ पैसे किलोचा दर मिळाल्याने वैतागलेल्या शेतकऱ्याने कांदा  रस्त्यावर फेकला.

प्रतिक्विंटल ५२ रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्याचा संताप

कांदा उत्पादकांना सरकाने दिलासा देत क्विंटलमागे २०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. कांद्याचे दर घसरलेलेच असून बुधवारी वैजापुरात एका शेतकऱ्याच्या कांद्याला बाजारपेठेत अवघा ५२ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्याने कांदा रस्त्यावर फेकून आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, वैजापुरातील मुख्य रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात कांदा फेकल्यामुळे जवळपास शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांनी संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकारामुळे वैजापुरात तीन ते चार तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कांद्याचे दर मागील काही दिवसांपासून गडगडलेले असल्यामुळे राज्य सरकारने २० डिसेंबर रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपयांचे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत नवी मुंबई वगळता इतर ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्री झालेल्या सुमारे ७५ लाख क्विंटल कांद्यासाठी हे अनुदान दिले जाणार असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुमारे ४० हजार रुपयांपर्यंतची ही मदत मिळणार आहे. त्यापोटी सरकारवर सुमारे दीडशे कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र कांद्याचे दर अजूनही गडगडलेल्या स्थितीतच असून बुधवारी वैजापूरजवळील चांडगाव येथील प्रमोद गायकवाड या शेतकऱ्याने आपला ३० क्विंटल कांदा बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला होता. त्या कांद्यासाठी शेतकऱ्याला ५२ रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

कार्यकर्ते आक्रमक

वैजापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातच मुख्य रस्त्यावर कांदा फेकल्यामुळे काही कार्यकर्त्यांनीही संताप व्यक्त केला. जवळपास दीडशे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी कांदा रस्त्यावर फेकणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे जवळपास तीन तास वैजापुरातील वातावरण तणावपूर्ण होते.

First Published on January 3, 2019 2:43 am

Web Title: onion on the road again at vaijapur