28 May 2020

News Flash

कांदा, डाळीनंतर गव्हाचे दर कोसळण्याची भीती

व्यापाऱ्यांच्या अंदाजाने शेतकरी धास्तावले

व्यापाऱ्यांच्या अंदाजाने शेतकरी धास्तावले

कांदा, टोमॅटोसह तूरडाळ, सोयाबीनच्या दरांमध्ये यंदा कमालीची घट झाली आहे. त्या रांगेत आता गव्हाचा क्रमांक लागण्याची भीती निर्माण करणारा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यंदा कडाक्याच्या थंडीनंतर पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र, गव्हाचे दर अठराशे ते दोन हजार क्विंटलपर्यंत घसरण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने गहू उत्पादकांमध्ये अस्वस्थता आहे.

मराठवाडय़ात २०१५ च्या पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला. परिणामी नद्या, विहिरी हिवाळ्यातच कोरडय़ा पडलेल्या होत्या. पाऊस नसल्याने जमिनीत पुरेशी ओलही नव्हती. त्यामुळे अनेक  शेतक ऱ्यांनी रब्बीत पीक घेतले नव्हते. २०१६ मध्ये समाधानकारक पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टीही झाल्याने पिके हातून गेली. परंतु खरीप जरी हाती लागला नसला तरी रब्बी हंगामाने आशा दाखवली. त्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यंदा थंडीही कडाक्याची पडली होती. त्या थंडीचा गहू, ज्वारी अशा पिकांना फायदा होऊ लागला. कणसातील दाणे भरू लागले. त्यामुळे पिके डौलदार दिसू लागल्याने शेतकरी समाधान व्यक्त करू लागला. पुढील १५-२० दिवसानंतर गहू, ज्वारीचे पीक काढणीला आलेले असेल. त्याचबरोबर बाजारपेठेत गहू, ज्वारीची आवक वाढलेली दिसेल. परिणामी भावही गडगडण्याची अधिक शक्यता व्यक्त होत आहे. गव्हाचे दर सत्तावीसशे पासून अठराशे पर्यंत खाली येण्याचा अंदाज येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात गव्हाची आवक होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर महिनाभरात आवकचे प्रमाण वाढेल. त्यातून दर खाली येत राहतील. मार्च-एप्रिलच्या दरम्यान गव्हाचे साधारण अठराशे ते २ हजार क्विंटलपर्यंत दर येऊ शकतात, असा अंदाज बाजार समितीचे संचालक व व्यापारी प्रवीण सोकिया यांनी व्यक्त केला आहे.

मागील सहा महिन्यांपासून शेतीमालाच्या किंमती ४० टक्क्य़ांपर्यंत खाली आल्या आहेत. किलोमागे दीडशे रुपयांच्याही पुढे दर गेलेल्या तुरीचे दर आता ६० रुपयांच्याही खाली आले आहेत. सोयाबीनलाही २४०० ते २७०० रुपयांपर्यंतच दर मिळाला. कापूसही ५ हजारांच्याच आतबाहेर आहे. कांदा व टोमॅटोला मिळणारा दर पाहून शेतक ऱ्यांनी त्यांचा माल अक्षरश: जनावरांना खायला दिला. आता या गडगडलेल्या शेतीमालाच्या रांगेत गहू येण्याच्या उंबरठय़ावर असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. या परिस्थितीमुळे शेतक ऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे, अशी प्रतिक्रिया तरुण शेतकरी लक्ष्मण अनंतपुरे यांनी व्यक्ती केली. गव्हातून शेतकऱ्यांना फारसे हाती लागत नाही. केवळ घरात खाण्यासाठी म्हणून गहू पेरला जातो. त्यातून यंदा चांगले पीक आले असले तरी दर गडगडण्याचा अंदाज असल्याचेही अनंतपुरे यांनी सांगितले.

अडीच हजार क्विंटल तुरीची आवक

औरंगाबाद येथील बाजार समितीमध्ये दररोज सध्या बावीसशे ते अडीच हजार क्विंटलची आवक होत आहे. तुरीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाल्याने आवक वाढली आहे. यंदा मुबलक पाणी, थंडीमुळे ज्वारीचेही पीक समाधानकारक आलेले आहे. परंतु ज्वारीचाही दर २ हजार ते बावीसशेच्या आसपास राहील. आजच्यापेक्षा दर खाली आलेला दिसेल, पण ऊस नसल्यामुळे जनावरांना वाढय़ाऐवजी कडबाच घ्यावा लागेल. ज्वारीच्या आजच्या भावाची कसर कडबा विक्रीतून निघेल, असे शेतकरी लक्ष्मण अनंतपुरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2017 1:18 am

Web Title: onion prices fall 2
Next Stories
1 पोस्टाची पहिली बँक औरंगाबादेत
2 शिक्षकांची बेरीज-वजाबाकी सुरू
3 परभणीत राष्ट्रवादी विरुद्ध सारे!
Just Now!
X