अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका

विकासाचा मार्ग आरक्षणातून जातो अशी मानसिकता आता पूर्णत: रुजत आहे. सामाजिक आरक्षण हे काही कायमस्वरूपी नाही. मात्र, आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यास आपला विरोध असेल, अशी भूमिका भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. औरंगाबाद येथे आयोजित विभागीय मेळाव्यापूर्वी पत्रकार बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडली.

मराठा, ओबीसी, मुस्लिम या मोर्चामुळे अस्वस्थता समोर येत आहे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती खालावली आहे. काही उपेक्षित, वंचितांची स्थिती सुधारली आहे. त्यामुळे मराठा समाजात द्वेषमूलकता वाढली असेल. ते स्वाभाविकही आहे. आरक्षण हे कायमस्वरूपी नसले तरी ते आर्थिक निकषांवर देणे चुकीचे ठरेल. असे झाल्यास भारिप बहुजन महासंघ त्यास विरोध करेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. राजकीय पक्षांना जात पाहिजे. तरुणांनी या संकल्पना झुगारून दिल्या असून ते विकासाच्या प्रश्नावर एकवटले आहेत. मात्र, नेत्यांना तसे नको असल्याने जातीच्या अंगाने आरक्षणाचा मुद्दा पुढे येत आहे. बाबरी मशीद पाडू देताना जशी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी भूमिका बजावली आणि ती वास्तू पाडू दिली. त्यानंतर हा प्रश्नच निकाली निघाल्यासारखे वातावरण झाले. तसेच आरक्षणाचे करायला हवे, असेही ते म्हणाले. विकासाचा मार्ग आरक्षणातून जातो, अशी निर्माण झालेली मानसिकता असली तरी ते मिळण्याची शक्यता नाही, असे पी. बी. सावंत यांनीच सांगून ठेवलेले आहे. ते सध्या न्यायाधीश नसले तरी त्यांना त्याचे सर्व ज्ञान आहे. एका अर्थाने त्यांनी निकाल दिलाच आहे. तरीही आरक्षणाची मागणी होते. मराठा समाजाची आर्थिक स्थिती खालावली आहे, हे खरेच. पण आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देण्याचा विचार झाला तर त्यास विरोध असेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

नोटाबंदीच्या विरोधात भाष्य करणाऱ्यांना भाजपने देशद्रोही ठरवण्यास सुरुवात केल्यामुळे अनेक पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यावर बोलण्याचे टाळले. कोणी आम्हाला देशद्रोही म्हटले तरी चालेल, पण आता या विरोधात आंदोलन करणारच, असा इशाराही अ‍ॅड. आंबेडकर यांनी दिला. ‘या तो नोट दो या फिर रोटी दो’ असे असे आंदोलन करणार असून, पोलीस ठाणे व तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन होईल, असे त्यांनी सांगितले.