वंचित आघाडी आणि एमआयएममध्ये धुसफूस

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद लोकसभेसाठी माजी न्यायमूर्ती. बी. जी. कोळसे पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर मित्र पक्ष एमआयएमने कोळसे पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला. एमआयएमतर्फे स्वतंत्र उमेदवार उभा करण्यात येणार आहे. हा उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना कळविण्यात येईल व त्यांच्या सहमतीने एमआयएम निवडणूक लढवील, असे आमदार इम्तियाज जलील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या नव्या वक्तव्यामुळे वंचित बहुजन आघाडीत सारेकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यभर असुदोद्दिन ओवेसी आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना गर्दी होत आहे. औरंगाबादमध्ये या आघाडीची घोषणा झाल्यानंतर औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवली जाणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर बरेच दिवस गुलदस्त्यात होते. नांदेड येथील सभेत प्रकाश आंबेडकरांनी थेट औरंगाबाद लोकसभा निवडणुकीचे उमेदवाराचे नाव जाहीर केले. या पार्श्वभूमीवर सोमवारी एमआयएमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. ‘बाहेरून आलेल्या उमेदवारापेक्षा औरंगाबाद जिल्ह्य़ातलाच उमेदवार द्यावा आणि तो एमआयएमचा असावा, अशी मागणी करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या भावना एमआयएमचे अध्यक्ष असुदोद्दिन ओवेसी यांच्यापर्यंत पोहोचविले आहे. ते आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर दोघे मिळून यावर निर्णय घेतील, असे आमदार जलील म्हणाले.