औरंगाबाद : जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी दोन डॉक्टरासंह संबंधित महिलेचा पती, सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी दिले आहेत. याप्रकरणी जादूटोणा कायद्याअंतर्गत पीडितेचा पती किशोर सोपान भुजबळ, सासू लीला भुजबळ, सासरा सोपान विठ्ठल भुजबळ व डॉ. मोरे व डॉ. राठी (सरोज हॉस्पिटल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

या प्रकरणी संबंधित विवाहितेने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारदार महिलेचा विवाह पैठण तालुक्यातील रांजणगाव येथील किशोर सोपान भुजबळ याच्याशी ३० डिसेंबर २०१८ रोजी झाले होते. गर्भधारणेनंतर तिला एमआयडीसी वाळूज येथील डॉ. राहुल इंदे यांच्याकडे उपचारासाठी नेले. त्यानंतर तिचा सासरा सोपान भुजबळ याने तिला डॉ. इंदे यांच्याकडे न नेता डॉ. मोरे यांच्याकडे नेले. तेथे लिंबू खाऊ घालण्याचा प्रकार झाला. नंतर डॉ. मोरे यांच्या ओळखीच्या अमरप्रीत चौकातील सरोज हॉस्पिटल येथील डॉ. राठी यांच्याकडे नेण्यात आले. तिथे तिला भूल देऊन तिचा गर्भपात करण्यात आला. या प्रकरणात तिने ९ जुलै २०१९ रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात, तर ११ सप्टेंबर २०१९ रोजी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीची दखल न घेतल्याने पीडितेने सहायक आयुक्त नागनाथ कोडे यांना तक्रारीचा अर्ज दिला. कोडे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतरही क्रांती चौक पोलिसांनी कुठलीच कारवाई न केल्याने विवाहितेने अ‍ॅड. दिलीप खंडागळे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने तक्रारीची गंभीर दखल घेऊन जादूटोणा कायद्याअंतर्गत पीडितेचा पती किशोर सोपान भुजबळ, सासू लीला सोपान भुजबळ, सासरा सोपान विठ्ठल भुजबळ, डॉ. मोरे व डॉ. राठी (सरोज हॉस्पिटल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे न्यायालयाने आदेश दिले. डॉ. खंडागळे यांना अ‍ॅड. आशिष सूर्यवंशी व अ‍ॅड. मिलिंद रंधवे यांनी सहकार्य केले.