तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवा अशा सूचना उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी गुन्हे अन्वेषण विभागाला केल्या आहेत. देवीच्या खजिन्यातून मौल्यवान माणिक आणि पुरातन नाणी कर्मचाऱ्यांनी लंपास केल्याचा अहवाल अलीकडेच देण्यात आला होता. या अहवालाच्या आधारे गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विविध राजे आणि संस्थांकडून अर्पण करण्यात आलेले दागिने गायब करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर खळबळ उडाली होती. चांदी-सोन्याचे दागिने आणि प्राचीन नाणी गायब झाल्याची तक्रार पुजारी किशोर गंगणे यांनी दिली होती. वारंवार माहितीच्या अधिकारात पाठपुरावा केल्यानंतरही माहिती दिली जात नव्हती. महंताकडे देण्यात आलेल्या बेकायदा दागिन्यांचे लेखापरीक्षण होणे अजूनही बाकी आहे. या पूर्वी सिंहासन पेटीमधील गैरव्यवहार आणि कंत्राट देताना घातलेले घोळ  याचा एक अहवाल  या पूर्वी गुन्हे अन्वेषण विभागाने तयार केला आहे. मात्र त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. आता नवा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिल्या आहेत.