हृदय व यकृत मुंबईत, मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण औरंगाबादमध्ये

औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात मंगळवारी हृदय, यकृत व मूत्रपिंडांचे अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. १९ फेब्रुवारी रोजी सिल्लोड-फुलंब्री रस्त्यावर झालेल्या अपघातानंतर मिलिंद मनोहर येलवाडे या ३० वर्षांच्या युवकाचा मेंदू मृत झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या नातेवाईंकांनी अवयवदान करावे, अशी विनंती करण्यात आली. मिलिंदची आई पुष्पा यांनी अवयवदानास परवानगी दिल्यानंतर आज घाटी रुग्णालयात अवयव काढण्याची शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हृदय मुंबई येथील फोर्टीज रुग्णालयात, तसेच यकृतही मुंबई येथे प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले असून शहरातील रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी देण्यात आले. दुपारी शस्त्रक्रियेची कारवाई झाल्यानंतर ग्रीन कॉरिडॉर करुन अवयव पाठविण्यात आले.

रविवारी झालेल्या अपघातानंतर मिलिंद येलवाडे या तरुणास घाटी रुग्णालयातील वार्ड क्र. आठमध्ये दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या मिलिंदच्या आईला अवयवदानाची माहिती देण्यात आली. त्या अवयवदानासाठी तयार झाल्यानंतर क्षेत्रीय नियंत्रण समितीच्या परवानगीने मंगळवारी सकाळी ८.३० वाजता शस्त्रक्रिया करण्यात आली. घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता चंद्रकांत मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांनी अवयव सुरक्षितपणे काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. मुंबई व औरंगाबाद येथे या अवयवांचे प्रत्यारोपण होणार आहे. खरे तर घाटी रुग्णालयाच्या अनेक अडचणी आहेत. कधी औषधे मिळत नाहीत तर कधी पाण्याची ओरड असते. कुत्रा चावलेले इंजेक्शनही अधुनमधून नसते. अशा स्थितीमध्येही तज्ज्ञांनी केलेले काम स्पृहणीय मानले जात आहे.