04 April 2020

News Flash

अवयवदानाचा एकमुखी संकल्प करणारी ‘आनंदवाडी’

आनंदवाडी या अवघ्या १२५ उंबऱ्यांच्या गावचे वैशिष्टय़ अतिशय वेगळे.

ग्रामीण महाराष्ट्राची बहुतांश ठिकाणची स्थिती एकीकडे विदारक, बकाल झालेली असताना दुसरीकडे काही गावे प्रगतीच्या दिशेने जाणारी, पारंपरिक संस्कृतीचा पगडा झुगारणारीही आहेत. त्यादृष्टीने  अवयवदानासारखा संकल्प एकमुखाने करणारे गाव पाहायचे असेल तर त्यासाठी एकदा तरी निलंगा तालुक्यातील आनंदवाडीला (गौर) भेट द्यावी लागेल. आनंदवाडीत डोळ्यांना आनंद देणारीच कामे दृष्टीस पडतात. तेथील स्मशानभूमी स्वच्छ तर दिसेलच पण मृतांची राख नदीमध्ये विसर्जित न करता शेतात नेऊन पुरणारे किंवा झाडे लावणारे ग्रामस्थ, घरातील महिलांचेही नाव ८ अ च्या उताऱ्यावर लावणारे पुरुष आणि आता अवयवदानाचे महत्त्व पटले म्हणून त्यासाठी संकल्पाचा अर्ज भरून ‘देणारा हात’ पुढे करणारे अवघे जनही पाहायला मिळतील. असे आगळे-वेगळे गाव पाहण्यासाठी मुख्यमंत्री, वैद्यकीय सहायता निधीचे कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे हे ८ जानेवारीला येत आहेत.

आनंदवाडी या अवघ्या १२५ उंबऱ्यांच्या गावचे वैशिष्टय़ अतिशय वेगळे. प्रत्येक घरात नळयोजना पोहोचली आहे. गाव पाणंदमुक्त झाले आहे. प्रत्येक घराच्या ८ अ उताऱ्यावर पुरुषाबरोबर महिलांचेही नाव नोंदवलेले आहे. घराच्या दर्शनी भागावर महिलेच्या नावाने पाटीही लटवलेली आहे. आता नोटाबंदीच्या काळात रोखविरहीत व्यवहार करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. गावात बुधवारी याची कार्यशाळाही घेण्यात आली. गावातील विविध उपक्रम लोकवाटय़ातून पार पाडत या गावाने आपले आनंदवाडी हे नाव सार्थ केले आहे.

गावातील रस्ते व विविध योजनांत लोकांनी आपला सहभाग दिला आहे. ग्रामपंचायतीची स्वतच्या मालकीची दोन मजली इमारत बांधण्यात आली आहे. गावाच्या सरपंच भाग्यश्री चामे व उपसरपंच शोभा कासले या दोन्ही महिलांनी गावचा गाडा अतिशय उत्तम रीतीने चालवला आहे. या गावची स्मशानभूमी अतिशय मोठी, स्वच्छ आहे. स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण केल्यामुळे संपूर्ण परिसर हरित बनला आहे. या परिसरात महिला पंचमीच्या दिवशी भुलई खेळतात व गावातील मुले व्हॉलिबॉल खेळतात. अंत्यविधी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी रक्षा पाण्यात विसर्जति करण्याची प्रथा सर्व ठिकाणी आहे. मात्र, या गावात महिलांनी पुढाकार घेऊन संबंधित कुटुंबीयाने राख आपापल्या शेतात नेऊन पुरावी, असा आग्रह धरला व त्यावर एक झाड लावावे असा सल्ला दिला त्यातून लोकांनी सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

गावातील मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे असा आग्रह धरत त्यांनी पदवी मिळवावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो असे गावच्या सरपंच भाग्यश्री चामे यांनी सांगितले. सामुदायिक लग्नसोहळय़ामुळे लोकांचा खर्च वाचेल हे लोकांना समजावून सांगत यावर भर दिला जातो आहे व त्याला गावकरी चांगला प्रतिसादही देत आहेत.

रोटरी क्लबने हे गाव तीन वर्षांसाठी दत्तक घेतले असून या गावात शाळेत ई-लìनगची सुविधा उपलब्ध केली आहे. ग्रामपंचायतीच्या साहाय्याने गावातील रस्त्याच्या दुतर्फा पाचशे फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. राखी पौर्णिमेच्या दिवशी गावातील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सौरऊर्जेवर चालणारे पाणी शुध्दीकरण यंत्रही शाळेत बसवले जाणार आहे. महिलाच गावचा पुढाकार करणाऱ्या असल्यामुळे घरोघरी एलईडी बल्बचा वापर केला जातो आहे. गावकऱ्यांकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल रोटरी क्लबचे अध्यक्ष शिवराज लोखंडे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

ग्रामस्थांना रविवारी सन्मानपत्र

३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०१६ या सप्ताहात अवयवदान जागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. रोटरी क्लब ऑफ लातूर सिटीने या गावात प्रबोधनासाठी लक्ष दिले. प्रारंभी १०, नंतर २० असे करत गावातील ४१० जणांनी आपले संमती अर्ज भरून दिले. रविवार, ८ जानेवारी रोजी या गावात गावकऱ्यांना सन्मानपत्र देण्याचा कार्यक्रम योजण्यात आला असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे उपस्थित राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2017 1:31 am

Web Title: organ donation in maharashtra
Next Stories
1 नोटाबंदी निर्णयाच्या विरोधात काँग्रेसचा ८ जानेवारीला घंटानाद
2 ग्रामीण विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ
3 नोटाबंदीनंतर कापूस शेतकऱ्यांच्या घरातच!
Just Now!
X