आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे या अभिनेत्यांना पुढे करून सरकार मूळ प्रश्नाला बगल देत आहे, असा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. प्रदेशाध्यक्ष कालिदास आपेट या वेळी उपस्थित होते.
शेतीमालास योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे आजपर्यंत सर्व तज्ज्ञांनी व सरकारी अहवालानेही मान्य केले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी हमीभाव, तसेच किमान ५० टक्के नफा मिळण्याइतपत भाव शेतीमालास दिला पाहिजे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात मान्य केले होते. मात्र, त्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे सरकारविरोधात ७ फेब्रुवारीला याचिका दाखल करण्यात आली. या दरम्यान केंद्र सरकारचे सचिव रामनरेश यादव यांनी निवडणूक काळात सरकारने आश्वासन दिले असले तरी स्वामीनाथन आयोगाप्रमाणे भाव देऊ शकत नसल्याचे लेखी मान्य केले. आता सरकार मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळाव्यात, या साठी मानसोपचारतज्ज्ञांना गावोगावी पाठवणार आहे. या वर्षी महाराष्ट्र सरकारने मानसोपचार तज्ज्ञांसाठी २२ कोटींची तरतूद केली आहे. आम्हाला मनोरुग्ण ठरवून मानसोपचारतज्ज्ञांचे पोट भरण्यासाठी सरकार अशी उपाययोजना करीत असेल तर या तज्ज्ञांना चाबकाने फोडून काढू, असेही पाटील यांनी बजावले.
आतापर्यंत अनेक दुष्काळ होऊन गेले व आजवर ३ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, तेव्हा मदतीसाठी अभिनेते धावून आले नव्हते. या वेळी मदतीसाठी धावून का येत आहेत? आगामी काळात उद्योगपतीही धावून येतील. मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारची ही खेळी असल्याचा आरोप पाटील यांनी केला. शेतकऱ्यांच्या नावाने ठिबक सिंचनासाठी अनुदान द्यायचे, प्रत्यक्षात त्याचा लाभ उद्योगपतींना होतो. शेतकऱ्याला मात्र कोणताही लाभ होत नाही. ५० पसे भावाने कांदा विकला तेव्हा कोणी शेतकऱ्याच्या मदतीला आले नाही. आता ८० रुपये कांदा झाला म्हणून गळय़ात कांद्याच्या माळा लटकावणाऱ्या व ओठाच्या रंगासाठी ५०० रुपये खर्च करणाऱ्या मंडळींना समुपदेशनाची खरी गरज आहे. रोग हाल्याला व इंजेक्शन पखालीला ही भूमिका चालणार नाही. शेतमालास योग्य भाव दिला पाहिजे. या साठी सरकारने पावले उचलली पाहिजेत. २ ऑक्टोबरला लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त दिल्लीत १ लाख शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जाणार असल्याचेही ते म्हणाले.