‘डीएमआयसी’मध्ये रशिया आणि चीन कंपन्या इच्छुक

खास प्रतिनिधी, औरंगाबाद</strong>

औरंगाबाद येथे दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ात रशिया आणि चीनच्या कंपन्या इच्छुक आहेत. तसेच जापानची ‘फू-जी’ ही कंपनीही मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती उद्योग मंत्रालयातील उच्च पदस्थ सूत्रांनी दिली. औरंगाबाद येथे ‘ऑरिक सिटी’च्या इमातीच्या लोकार्पण सोहळय़ासाठी पंतप्रधान नेरेंद्र मोदी शनिवारी औरंगाबाद येथे येणार असून त्यांच्या येण्याच्या पाश्र्वभूमीवर कोणत्या कंपन्यांकडून गुंतवणूक होईल, याची माहिती दिली जात आहे. शनिवारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला बचत गटातील एक लाख महिलांशीही पंतप्रधान संवाद साधणार आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणांनी तयारीला वेग दिला आहे.

औरंगाबाद शहरातील ऑरिक ही स्मार्ट सिटी वेगाने तयार करण्यात आलेली पायाभूत सुविधा असून येथे भूमिगत केबल टाकण्यात आल्या असून हे स्मार्ट शहर पूर्णत: सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असणार आहे. या प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणात जमीन घेतल्यानंतरही मोठे गुंतवणूकदार आले नव्हते. मात्र, येत्या काळात ते येतील असे सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर  संयुक्त अरब अमिरातमधील एमार प्रॉपर्टीजच्या इगल हिल्स इन्व्हेस्टमेंट कंपनी बिडकीन येथे साडेनऊ हजार कोटीची गुंतवणूक करणार आहे. तसे करारही बुधवारी मुंबई येथे करण्यात आले आहेत. खाद्य पदार्थाच्या क्षेत्रातही गुंतवणूक असणार आहे. यामुळे रोजगारही वाढतील, असा दावा केला जात आहे. या कंपनीबरोबरच रशिया आणि चीनमधील काही कंपन्याही गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका बाजूला उद्योगाला चालना देताना ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांशीही पंतप्रधान संवाद साधणार आहेत. बचत गटातील महिला आता पापड, लोणचे या पुढचा उद्योग करू लागल्या असल्याची माहिती सरकारी अधिकारी देत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा संवाद सत्ताधारी भाजपला अधिक बळ देणारा असल्याचाही दावा राजकीय अभ्यासक करू लागले आहेत.

महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत होणाऱ्या मेळाव्याची तयारी सुरू करण्यात आली असून ३३ हजार चौरस मीटरवर मंडप उभारण्यात येत आहे. एक लाखांहून अधिक महिला या मेळाव्यासाठी राज्यभरातून येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था आणि येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळे उभारली जात आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने विशेष पोलीस महानिरीक्षक जातीने लक्ष घालत असून ५०० हून अधिक पोलीस अधिकारी बंदोबस्तास येणार आहेत. विशेष सुरक्षा दलाचे अधिकारीही कार्यक्रम स्थळ आणि पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार आहेत, त्या मार्गाच्या सुरक्षिततेबाबतची खातरजमा करीत आहेत. कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची यंत्रणा कामाला लागली आहे. महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाचे वरिष्ठ अधिकारी आणि जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर महिला मेळाव्याच्या तयारीचे समन्वयक म्हणून काम पाहात आहेत. आज दिवसभरात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पर्किन्स कंपनीसमोरील तयारीची माहिती घेतली. पंतप्रधानांच्या ‘डीएमआयसी’ प्रकल्पासाठी आयोजित या दौऱ्यामुळे मराठवाडय़ातील उद्योगाला नवीन संधी उपलब्ध होतील, असा दावा उद्योजक करत आहेत.